पन्नाशीतील उमेदवारांच्या हाती बुलडाण्याचे राजकारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:03 PM2019-10-07T14:03:54+5:302019-10-07T14:04:23+5:30
बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख पाच जणांचे वय ५३ वर्षांच्या आत असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून मिळाली.
सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राजकारणात वयाची पन्नाशी तरुणपणाचे लक्षण मानल्या जाते. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख पाच जणांचे वय ५३ वर्षांच्या आत असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून मिळाली. त्यामुळे निवडून कुणीही आले तरी पन्नाशीतील उमेदवाराच्याच हाती बुलडाण्याचे राजकारण येणार असल्याचे दिसून येते.
क्षेत्र कुठलेही असो वयाची अट ठरलेली असते. राजकारणात मात्र वयाचे बंधन नाही. उलट वाढलेले वय राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानल्या जाते. राज्य आणि केंद्रातील नेत्यांच्या वयाकडे नजर टाकल्यास अनेकांनी सत्तरी, ऐंशी पार केल्याचे दिसते. मात्र असे असले तरी राजकारणात तरुणांना संधी मिळाली पाहिजे. राजकारणात पन्नाशी पार केलेल्या नेत्यांनाही तरुणच समजले जाते. शिवाय राजकारणातील व्यक्ती शारीरिक तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे तसेही त्यांचे वय तरुणच दिसते. ८० ते ९० वर्ष वयाचे अनेक नेते, पुढारीही राजकारणात सक्रिय आहेत.
शारीरिक तंदुरुस्ती ठेवत अजूनही कामाचा व्याप सांभाळतात. डोक्यावरचे 'केस' गेले अन अंगावर 'केसेस' वाढल्या म्हणजे राजकारणी असेही राजकारणाबद्दल उपहासाने म्हटले जाते. वय वाढले म्हणजे परिपक्वता येते ही गोष्ट खरी असली, तरी राजकारणात तरुणांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे अनेक पक्ष तरुणांना संधी देण्याची भूमिका घेतात.
वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवारांना कुठलीच उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे भाजपने अलीकडेच जाहीर केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादीत पार्टीत तरुणांसह ज्येष्ठ नेते काम करतात.
असे आहे उमेदवारांचे वय
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ आॅक्टोबर शेवटची तारीख होती. बुलडाणा मतदारसंघात सात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी प्रमुख पाच उमेदवारांचे वय ५३ वर्षांच्या आत आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ ५१, संजय गायकवाड ५३, योगेंद्र गोडे ५१, विजयराज शिंदे ५२ व मोहम्मद सज्जाद अब्दूल खालिक यांचे वय ५० वर्ष आहे. बुलडाण्यातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये इतर गोष्टी भिन्न असल्या तरी वयात मात्र बरेच साम्य असल्याचे दिसून येते.