उमेदवारांना मिळणार केवळ सात दिवस
By admin | Published: September 7, 2014 12:13 AM2014-09-07T00:13:01+5:302014-09-07T00:42:06+5:30
उमेदवारांची दमछाक ; राजकीय पक्षांची होणार धावपळ
सिद्धार्थ आराख / बुलडाणा
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंंत उमेदवारांना यापूर्वी तब्बल २0 दिवसांचा अवधी मिळत होता. यावेळी निवडणूक आयोगाने हा कालावधी कमी करून केवळ सात दिवसांचाच ठेवण्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे अर्ज दाखल करणार्या उमेदवारांची व त्यांच्या पक्षांची चांगलीच धावपळ होणार आहे.
निवडणुका जशा जवळ येतात, तसे राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा प्रश्न जटिल बनत जातो. त्यामुळे आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंंंत बर्याच पक्षाचे उमेदवार जाहीर होत नाहीत. या प्रक्रियेसाठी तब्बल २0 दिवसांचा कालावधी मिळत असल्याने राजकीय पक्षही उमदेवारीचा निर्णय अखेरच्या टप्यात जाहीर करतात, या कालावधीमुळे उमेदवरांना लागणार्या कागदपत्राची पूर्तता करणे, कार्यकर्ते व तिकीट नाकारलेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे
काम राजकीय पक्ष करतात; मात्र यावेळी हा वेळ मिळणार नाही. ज्या दिवशी आचारसंहिता लागू होईल त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करून कामाला लागावे लागणार आहे. परिणामी उमेदवार व त्यांच्या पक्षाची चांगलीच धावपळ होणार आहे. दिवाळीसारखा मोठा उत्सव समोर असल्याने हा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याची माहिती आहे.