तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त
By निलेश जोशी | Published: December 13, 2023 02:09 PM2023-12-13T14:09:40+5:302023-12-13T14:10:31+5:30
कारवाईसाठी लागले १६ तास : गांजाची किंमत १ कोटी ४० लाख
बुलढाणा/लोणार : हत्ता-तांबोळा परिसरातील एका तुरीच्या पिकात गांजाची शेती करणाऱ्या एकाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत शेतातून १४ क्विंटलची ट्रॉलीभर गांजाची झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांना तब्बल १६ तासांचा कालावधी लागला. १ कोटी ४० लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा हा गांजा आहे.
याप्रकरणी अनिल धुमा चव्हाण (४५, रा. हत्ता) यास ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी बुलढाणा तालुक्यातील धाडनजीकही ‘एलसीबी’ने आंध्र प्रदेशातून येणारा ९२ लाख रुपयांचा गांजा पकडला होता. त्या कारवाईनंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. हत्ता-तांबोळा परिसरात एका शेतकऱ्याने दुर्गम भागातील आपल्या तीन एकर शेतात तुरीच्या शेतात गांजाची शेती केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याआधावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यानी कारवाई करीत हा एक कोटी ४० लाख २७ हजार ७०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ प्रतिबंधाविरोधतील ही अलीकडील काळात लोणारमधील मोठी कारवाई आहे. माळरानावरील शेतात अनिल चव्हाण याने तीन एकरात ही गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती ‘एलसीबी’चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काकडे व पोलिस कॉन्स्टेबल दीपक वायाळ हे घेत होते. त्याची पक्की माहिती झाल्यानंतर अनुषंगिक अहवाल पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांना देण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मंगळवारी दुपारपासून सुरू होती कारवाई
१२ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. बुधवारी सकाळी ८ वाजता जप्त केलेली गांजाची १४ क्विंटल झाडे एका ट्रॅक्टरमधून लोणार पोलिस ठाण्यात आणण्यात आली. ‘एपीआय’ सचिन कानडे यांच्या तक्रारीवरून ालेणार पोलिस ठाण्यात ‘एनडीपीएस’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे, नीलेश सोळंके, सचिन कानडे, शरद गिरी, दीपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, दिनेश बकाले, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन दराडे, अमोल शेजोळ, वैभव मगर, मनोज खराडे, दीपक वायाळ, वनिता शिंगणे, शिवानंद मुंडे, विलास भोसले, लोणारचे पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, राजेंद्र घोगरे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.