सेना व राकाँच्या पदाधिका-यांना घेतले ताब्यात
By admin | Published: January 25, 2016 02:20 AM2016-01-25T02:20:06+5:302016-01-25T02:20:06+5:30
शेगाव येथे पालकमंत्र्यांना दाखविणार होते काळे झेंडे
शेगाव (जि. बुलडाणा): रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठी शेगाव येथे आलेल्या महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांचा रस्ता अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना शेगाव पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. शेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बावीस्कर यांना वेळीच ही माहिती मिळाल्याने त्यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. शिवसेनेने १८ जानेवारी रोजी आंदोलन करून या पुलाचे औपचारिक उद्घाटन केले होते. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते २४ जानेवारीला या पुलाचे विधिवत उद्घाटन झाले. या घटनाक्रमादरम्यान पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ही कारवाई करण्यात आली. शिवाजी चौकातून पोलिसांनी सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, सुधाकर शिंदे, दिनेश शिंदे, गजानन हाडोळे यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले. त्यानंतर लगेच अग्रसेन चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमित जाधव व अन्य पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या ताफ्याला ह्यगो बॅकह्ण व शासनाच्या निषेधाचे फलक दाखविण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आणि फलक व झेंडे जप्त करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अमित जाधव, शेख ताहीर, जगन्नाथ गायकवाड आदींचा समावेश आहे.