दुकान फोडणारा सीसी कॅमेऱ्यात कैद
By admin | Published: July 3, 2017 12:58 AM2017-07-03T00:58:35+5:302017-07-03T01:18:36+5:30
किराणा दुकानातून १० हजारांचा माल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव मही : स्थानिक सोलापूर-मलकापूर राज्य महामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात असलेले किराणा दुकान फोडून १० हजारांचा माल लंपास झाल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यावेळी दुकानात असलेल्या सीसी कॅमेऱ्यात चोर कैद झाला आहे.
देऊळगाव मही येथील सोलापूर-मलकापूर राज्य महामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात विजय श्रीराम शिंगणे यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी १ जुलै रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान बंद केले. दरम्यान, एका अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. तसेच जवळपास १० हजारांचा किराणा माल लंपास केला. ही घटना २ जुलै रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर विजय शिंगणे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित भाऊ संदीप यास माहिती देऊन दुकानात लावण्यात आलेले सीसी कॅमेऱ्यात पाहण्यास सांगितले. यावेळी सदर अज्ञात चोरट्याने दुकानावरी पत्रा कापून आत प्रवेश केल्यानंतर सीसी कॅमेऱ्यासमोर पाकिट आडवे लावले. मात्र, काही वेळानंतर कॅमेऱ्यासमोर लावण्यात आलेले पाकिट खाली पडले. त्यामुळे चोरीच्या घटनेचे चित्रण कॅमेऱ्यात आले. याबाबत विजय शिंगणे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अकील काझी, इंगळे, बालोद, काकडे करीत आहेत. तसेच परिसरातून एक मोटारसायकल चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे चोरट्यास अटक करावी, अशी मागणी होत आहे.