भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी; घर २ किमीवर असतानाच अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:29 AM2023-05-22T10:29:27+5:302023-05-22T11:38:06+5:30
शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.
बुलडाणा - रस्ते महामार्गांचा विकास साधून अपघात टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, वाहनांची वाढती संख्या, वाढीव वाहतूक आणि हायस्पीड प्रवासामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येते. आता, पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परत येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळ मोठा अपघात घडला.
शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार झाले तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यात हलवण्यात आले आहे. क्रुझर चालकाला झोप लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले अन् हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण, रात्री पासून या गाडीचा प्रवास सुरु होता. विशेष म्हणजे पीडित कुटुंबीय हे त्यांच्या घरापासून अवघ्या २ किलो मीटर अंतरावर असतानाच हा अपघात झाला.
दरम्यान, मृतक व जखमी चिचखेड, मच्छिंद्रखेड येथील आहेत. यामध्ये पूर्वी नितीन ठाकरे 23,परशुराम लांजुळकर वय 30 रा आळसणा,सुनंदा गजानन झोटे वय 41 हे जागीच ठार झाले. तसेच स्वामिनी हरिदास भारंबे वय 24 रा मच्छिंद्रखेड, शितल अक्षय भारंबे 30 ,प्रांजली दत्तात्रय पारस्कार सावळा, सागर विलास साठे30 तरोडा डी, शुभागी सागर झाटे ,ज्योती ज्ञानेश्वर भारंबे 39 मच्छिंद्रखेड ज्ञानेश्वर वसंता भारंबे30 मच्छिंद्रखेड, ओवी अक्षय भारंबे 1, श्लोक नितिन ठाकरे 13 , योगीराज सागर घाटे वय 2 ,सार्थक अक्षय भारंबे 6,अक्षय वसंत भारंबे 38 मच्छिंद्रखेड, नितिन ठाकरे 35 कोदरी,जिजाबाई वसंता भारंबे 45 मच्छिंद्रखेड , प्रमिला पाटील 45 टाकळी हे जखमी झाले.
जखमी पैकी तिघाची प्रकृती चिंताजनक आहे. मच्छिंद्रखेड, तरोडा डी येथील भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनाहंन घराकडे परतले असता शेगाव जवळ वाहनाचा अपघात झाला.