काेराेना संक्रमणाचा शेती कामांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:39+5:302021-05-30T04:27:39+5:30
मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; ...
मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; परंतु कोरोनाने सध्या शेतकरी हैराण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांमध्ये १ जूननंतर शिथिलता येण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला मार्केट व ग्रामीण भागातसुद्धा बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर आपल्या शेतातील भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. यामध्ये डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला खते, बी-बियाणे खरेदी करायचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. बहुतांश कुटुंबामध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने त्यांचा आर्थिक कणा उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. तेव्हा कृषी केंद्र संचालकांनी आपण आपला माल विकताना योग्य दरात विक्री करावा, कारण शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. हार्डवेअर, खत विक्री केंद्र यामध्ये भरपूर प्रमाणात अवास्तव बिल लावून विक्री करताना आढळून येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र संचालक व हार्डवेअर दुकानदारांनी परिस्थितीचे भान ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.