काेराेना लस : पायाभूत सुविधांचा प्रशासनाकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:53 AM2020-11-03T11:53:55+5:302020-11-03T11:54:07+5:30
Buldhana corona virus news लस उपलब्ध झाल्यास ती त्वरित देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम व तयार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास आरोग्य विभागाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोनाची लस पुढील वर्षी उपलब्ध झाल्यास ती फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रथमत: देण्यात येणार असल्याचे स्पष्टच असले तरी या मोहिमेची व्याप्ती मोठी असणार आहे.
मात्र त्यासंदर्भाने वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शक सुचना अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. पुढील काळात अशी मोहिम राबवावी लागल्यास ती किमान सहा ते आठ महिने चालेल. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम असून तसा आढावाही स्थानिक पातळीवर घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. पुढील वर्षी प्रसंगी कोरोनाची लस येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात ती कधी येईल हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारीला प्राधान्य देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर रोजीच्या राज्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राच्या अनुषंगाने ही तयारी सुरू आहे.
ही लस उपलब्ध झाल्यास ती त्वरित देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम व तयार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
कोरोना संसर्ग व तत्सम बाबी पाहता या मोहीमेची व्याप्ती मोठी राहणार आहे. त्यामुळे प्रसंगी ही मोहीम सहा ते आठ महिनेही चालण्याची शक्यता जुन्या मोहिमांचा अनुभव घेतलेल्या आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
त्यानुषंगाने आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असलेली शितकरण उपकरणे, त्यांची स्थिती, वाहतूक, लस देण्यासाठी प्रथमत: कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे प्रशिक्षण हे मुद्दे घेवून माहिती संकलीत करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागातील ५३, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातंर्गतच्या १३, खासगी रुग्णालयापैकी १४६ रुग्णालयांमधील सुविधांची सविस्तर माहिती आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर संकलीत करण्यात आली आहे.