सिनगाव जहाँगीर येथे काेरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:38 AM2021-02-20T05:38:54+5:302021-02-20T05:38:54+5:30
सिनगाव जहाँगीर येथे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अचानकपणे कोरोनाबाधित रुग्ण निघू लागले. १६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १५ कोरोनाबाधित रुग्ण ...
सिनगाव जहाँगीर येथे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अचानकपणे कोरोनाबाधित रुग्ण निघू लागले. १६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १५ कोरोनाबाधित रुग्ण निघाले. त्यामुळे प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तहसीलदार सारिका भगत यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने तातडीने गावातच कोरोना चाचणी तपासणी शिबिराचे आयोजन केले. या वेळेस कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. सरपंच लता गिते, प्रकाश गिते, गजानन पवार आदींनी नागरिकांना कोरोना तपासणी करण्यासाठी आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी दत्ता मान्टे व त्यांच्या आरोग्य विभागातील चमूने गुरुवारी दिवसभर रुग्णांच्या संपर्कातील लोकांची कोरोना तपासणी करून घेतली. संचारबंदी लागू झाली असून नागरिकांनी गर्दी करू नये. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. तोंडाला मास्क बांधून सॅनिटायझरचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार सारिका भगत यांनी केले आहे.