हुंड्यासाठी लग्न मोडणा-या वर मंडळीवर गुन्हा दाखल
By Admin | Published: January 6, 2015 12:15 AM2015-01-06T00:15:03+5:302015-01-06T00:25:33+5:30
बुलडाणा जिल्हय़ातील कोल्ही गोल्हर येथील घटना.
धामणगाव बढे (मातोळा, जि. बुलडाणा): मागितलेला हुंडा वधूपक्षाकडून न मिळाल्यामुळे वरपक्षाने लग्न मोडल्याचा प्रकार मोताळा तालुक्यातील कोल्ही गोल्हर गावात ४ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी वधूपित्याने धामणगाव बढे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वरासह त्याचे वडील व भाऊ तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील कोल्ही गोल्हर येथील सुपडा नामदेव वाघोदे यांच्या मुलीचा विवाह जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील राजूर येथील वसंत आनंदा तायडे यांचा मुलगा विजय याच्याशी निश्चित झाला होता. त्यानुसार विवाह समारंभ ४ जानेवारी रोजी कोल्ही गोल्हर येथे पार पडणार होता; परंतु वराकडील मंडळीने ३ जानेवारी रोजी हुंड्याच्या रकमेची मागणी केली. तर ४ जानेवारी रोजी विवाह मुहूर्तापर्यंत वरपक्षाची वरात वधूमंडपी न आल्याने आपली हुंड्यापायी फसवणूक झाल्याचे वधूपित्याचे लक्षात आले. यामुळे वधूपिता सुपडा नामदेव वाघोदे रा. कोल्ही गोल्हर यांनी ४ जानेवारी रोजी रात्री धामणगाव बढे पोलीस स्टेशनला तक्रारी दिली. तक्रारीत नमूद आहे की, वर पक्षाने साडेचार लाख रुपये हुंड्याची मागणी लग्नापूर्वी केली होती. एवढे पैसे देण्याची ऐपत नसल्यामुळे सदर मागणी वधूपित्याकडून पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे ४ जानेवारी रोजी वर मंडळीकडून लग्नाची वरात वधूमंडपी न आल्यामुळे विवाह सोहळा होऊ शकला नाही. या तक्रारीच्या आधारे धामणगाव बढे पोलिसांनी वर विजय वसंत तायडे, त्याचे वडील वसंत आनंदा तायडे व भाऊ संजय तायडे या तिघांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक विरोधी कायदा कलम ४ नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.