विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी महाविद्यालयाच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: August 20, 2016 02:31 AM2016-08-20T02:31:12+5:302016-08-20T02:31:12+5:30
मोताळा तालुक्यातील घटना; शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास महाविद्यालयातील संबधितांनी केली होती टाळाटाळ.
धामणगाव बढे (जि.बुलडाणा), १९ : मोताळा तालुक्यातील कुर्हा येथील संजय मधुकर तायडे (२७) या विद्यार्थ्याने १७ ऑगस्ट रोजी कुर्हा येथे आत्महत्या केली. तपासात मृतक विद्यार्थ्यांंने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणार्या तीन व्यक्तींची नावे लिहून ठेवली. त्या आधारे शेगाव येथील सरस्वती महाविद्यालयाचे अध्यक्ष शरद शिंदे, कळमसरे बाबु, गौरव कोरेगावकर या तिघांविरूद्ध १९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. मृतक विद्यार्थी संजय मधुकर तायडे हा शेगाव येथे सरस्वती महाविद्यालयात तीन वर्षांंपासून एमसीएचे शिक्षण घेत होता. त्यास मिळणार्या शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास महाविद्यालयातील संबधितांनी टाळाटाळ करून त्यास त्रस्त केले होते. या प्रकारास वैतागून संयजने कुर्हा येथे घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने चिठ्ठीमध्ये संबंधित आरोपींची नावे लिहून ठेवली होती. या प्रकरणी विद्यार्थ्याचा भाऊ प्रभाकर मधूकर तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद शिंदे, कळमसरे बाबु, गौरव कोरेगावकर या तिघांविरूद्ध धामणगाव बढे पोलिसांनी कलम ३0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.