विजेच्या धक्क्याने मृत्यूप्रकरणी गुन्हा
By admin | Published: July 2, 2016 01:15 AM2016-07-02T01:15:37+5:302016-07-02T01:15:37+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील घटना; अवैध वीज जोडणीमुळे झाला होता अपघात.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : तालुक्यातील वडशिंगी येथील शेतकरी देवीदास नारायण उमाळे (वय ५२) यांचा शेतातील पोलचा स्टे आणि अर्थिंग तारात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे २३ जून रोजी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणी किसन नारायण उमाळे (वय ४५) रा. वडशिंगी यांनी ३0 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जा.पोलिसांनी डॉ.नीळकंठ ऊर्फ राजू रणछोडदास राठी रा.वडशिंगी याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३0४ (अ) आणि भारतीय विद्युत कायदा १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली. मुरादाबाद शिवारात आरोपीने फिर्यादीच्या शेतातून आपले शेतात अनधिकृतपणे इलेक्ट्रीक खांब उभे करून अनधिकृत इलेक्ट्रीक तारा जोडून अवैधरीत्या कनेक्शन घेतले. फिर्यादीच्या शेतात असलेल्या तारांमध्ये इलेक्ट्रीक करंट आल्यानेच फिर्यादीच्या भावाचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. तपास जळगाव पोलीस करीत आहेत.