जातीय समीकरणात पक्षीय राजकारणाला मिळत आहे खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 02:41 PM2019-04-07T14:41:25+5:302019-04-07T14:41:58+5:30

जळगाव जामोद : लोकसभा निवडणुकीस अवघा दीड आठवडा बाकी असताना जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही.

 Caste politics overcome the party politics | जातीय समीकरणात पक्षीय राजकारणाला मिळत आहे खो!

जातीय समीकरणात पक्षीय राजकारणाला मिळत आहे खो!

googlenewsNext

- नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद : लोकसभा निवडणुकीस अवघा दीड आठवडा बाकी असताना जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही. प्रमुख तीन उमेदवारांच्या प्रचाराने सुध्दा अपेक्षित जोर घेतल्याचे दिसून येत नाही. जातीयवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जळगाव जामोद मतदार संघात बरेचदा पक्षीय राजकारणाला खो मिळाल्याचे चित्र पहावयास मिळते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत असली तरी या मतदार संघात मात्र भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.डॉ.संजय कुटे व काँग्रेस नेते यांच्यातच खरी रस्सीखेच पहावयास मिळते.
सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सध्याचेच दोन उमेदवार रिंगणात असताना प्रतापराव जाधव यांना डॉ. राजेंद्र शिंगणेंपेक्षा सुमारे १९ हजार मतांची आघाडी होती. ही स्थिती सन २०१४ निवडणुकीत बदलेल असे वाटले होते. कारण या निवडणुकीत माजी आ. कृष्णराव इंगळे यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निवडणूक लढवित होते.
परंतु यावेळी मोदी लाटेत त्यावेळी आघाडीच्या उमेदवाराला सुमारे २६ हजार मतांनी युतीच्या उमेदवारापेक्षा मागे राहावे लागले होते. यावेळची परिस्थिती पुन्हा वेगळी आहे. सन २००९ चेच उमेदवार रिंगणात असले तरी वंचीत बहूजन आघाडीच्या माध्यमातून आ. बळीराम सिरस्कार हे रिंगणात असल्याने जातीय समीकरणात नेहमी आघाडीवर असलेल्या या मतदार संघात युती व आघाडी यापैकी कोणत्या उमेदवाराचे मताधिक्य हे तिसरे उमेदवार घटवितात हे पाहणे सुध्दा उत्सुकतेचे ठरणार आहे.
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात यावेळी २ लाख ८१ हजार ९१६ मतदार आहेत. हा आकडा आजपर्यंतच्या मतसंख्येपेक्षा सर्वात जास्त आहे. या मतदारांमध्ये १८ ते ४०-४५ वयोगटातील मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे.
हे मतदार नेमकी कोणती भूमिका घेतात. यावरच प्रमुख उमेदवारांचे मताधिक्याची मदार राहणार आहे. सन २०१४ सारखी यावेळी कोणतीही लाट दिसत नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक तुल्यबळ वाटत आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सामाजिक समिकरणांचाही यावर परिणाम जाणवू शकतो.
कुटेंची मतदार संघावर पकड
मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला या मतदार संघातून मताधिक्य मिळवून देण्यात आ.डॉ.संजय कुटे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. यावेळी सुध्दा ते मोदीजींच पंतप्रधान व्हावेत यासाठी युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना जळगाव जामेद मतदार संघातून मताधिक्य मिळाले पाहिजे यासाठी पूर्ण ताकद लावतील असा अंदाज आहे. कुणबी समाजासह इतर सर्व समाजातील तरूण वर्गाची नाळ आ. कुटे यांच्याशी जुळली आहे. दुसऱ्या बाजुला भाजपाचे पदाधिकारी हे खा. जाधव यांच्या कार्यपध्दतीवर फारसे खुष नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील पदाधिकारी खांदेपालटाने काही कार्यकर्ते नाराज आहेत. परंतु ही सर्व नाराजी दूर होवून ते परत कामाला लागतील असे दिसते.
काँग्रेस नेत्यांची भूमिका महत्वाची
या मतदार संघात संगीतराव भोंगळ, पांडुरंगदादा पाटील, विश्वनाथ झाडोकार यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतके नेते सोडल्यास राष्ट्रवादीची फार मोठी ताकद नाही. परंतु काँग्रेसचा मतकोटा मात्र मोठा आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये एकसंघतेचा मोठा अभाव दिसून येतो. जर ही नेते मंडळी मनापासून एकत्र आली आणि त्यांनी पूर्ण ताकदीनिशी मतदारांना राजी केल्यास या मतदार संघाचे वेगळे चित्र दिसू शकते. काँग्रेसचे नेटवर्क प्रत्येक गावापर्यंत पोहचले असल्याने त्याचा वेगळा प्रभाव पडू शकतो.
माळी समाज संभ्रमावस्थेत
वंचीत बहूजन आघाडीचे उमेदवार आ.बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे असल्याने माळी समाजाला त्यांच्याविषयी आस्था असणे स्वाभाविक आहे. ते इतर मतांच्या मदतीने स्पर्धेत आहेत, असा दावा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा असला तरी सद्यास्थितीत प्रचारात त्यांना या मतदार संघात अपेक्षित आघाडी घेता आली नाही हे वास्तव आहे. नेमके काय करावे अशी संभ्रमावस्था सध्या माळी समाजाची आहे. जळगाव जामोद मतदार संघात माळी समाजाचे मतदार हे इतर मतदार संघापेक्षा अधिक असल्याचे सांगतात.त्यानुषंगाने निवडणुकीचे चित्र सध्या अस्पष्ट असून पुढील आठवड्यात स्थिती अधिक स्पष्ट होईल.. परंतु जळगाव जामोद मतदार संघात जातीय समीकरणे कोणती वळणे घेतात यावर येथील गणिते राहतील.

Web Title:  Caste politics overcome the party politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.