दुष्काळात वाढली पशुपालकांची चिंता; गुरे ठरताहेत तोंड, पाय खुरी रोगाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:57 PM2019-01-15T17:57:37+5:302019-01-15T17:58:03+5:30
बुलडाणा: अनेक ठिकाणी गुरे तोंड व पाय खुरी या रोगाचे शिकार ठरत आहेत. थंडीमुळे आजारांचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात १० लाख २० हजार ३६ गुरांना या आजाराचा धोका निर्माण झाला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: अनेक ठिकाणी गुरे तोंड व पाय खुरी या रोगाचे शिकार ठरत आहेत. थंडीमुळे आजारांचे प्रमाण वाढले असून जिल्ह्यात १० लाख २० हजार ३६ गुरांना या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळत असल्याने दुष्काळात पशुपालकाची चिंता वाढली आहे. बदलत्या हवामानामध्ये जनावरांच्या आरोग्यावरही चांगला वा विपरीत परिणाम जाणवत असतो. ऋतुमानानुसार गुरांच्या समस्या वेगवेगळ्या आढळून येतात. अतिथंडीचाही जनावरांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. पर्यायाने उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट येते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त होणाºया थंडीने केवळ मानवांनाच नव्हे, तर जनावरांनाही त्रास सोसावा लागत आहे. या वाढत्या थंडीमुळे गुरांना विविध आजारांचा समाना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत, मात्र पशुसंवर्धन विभागाकडून वेळेवर योग्य ते लसीकरण केल्या जात नसल्याने गुरांना वेगवेगळ्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्याती काही ठिकाणी जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. गुरांना पाय व तोंड खुरी येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी सर्वसामान्यपणे खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात. गाय, म्हैस, बैल यासह वासरांनाही या तोंड व पाय खुरी रोगाने ग्रासले आहे. जिल्ह्यात एकूण पशुधन संख्या १० लाख २० हजार ३७ आहे. त्यात गायवर्ग व म्हैसवर्ग ५ लाख ६७ हजार ७३३, लहान पशुधन (वासरे) गायवर्ग व म्हैसवर्ग ६१ हजार २५७ आहेत. तर शेळी वर्ग १ लाख ७ हजार ३० व मेंढी वर्ग १० लाख २० हजार ३७ आहे. या संपुर्ण गुरांच्या अरोग्याच्यादृष्टीने जिल्ह्यात लसीकरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
वासरू दगावले
मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे अनेक गुरांना सध्या पाय व तोंड खुरीचा रोग झाला आहे. ऊमरा देशमुख येथील श्रीकांत वानखेडे यांच्या मालकीच्या गायीला मागील आठवड्यामध्ये तोंड व पाय खुरीचा आजार बळावला होता. दरम्यान, त्या गायीच्या वासरालाही हा रोग झाल्याने त्या वासराचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहान पशुधनांना धोका जास्त
मोठ्या पशुधनाला पाय व तोंड खुरीचा आजार आल्यास उपचारानंतर ते बरे होऊ शकतात. मात्र लहान पशुधनांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना या आजाराचा सामना करात येत नाही, त्यामुळे लहान पशुधनाला (वय एक वर्षपर्यंत) या आजारांचा धोका जास्त असतो. सध्या जिल्ह्यात असे लहान लहान पशुधन (वासरे) गायवर्ग व म्हैसवगाची संख्या ६१ हजार २५७ आहे.
थंडी वाढल्याने त्याचा गुरांवर परिणाम जाणवतो. त्यामध्ये खुरी रोगांचे प्रमाण वाढू शकते. ज्या गावांमध्ये गुरांना तोंड व पाय खुरीची लागन झाली आहे, अशा ठिकाणी तातडीने शिबीर घेऊन गुरांवर उपचार करण्यात येतील.
- डॉ. जी. आर. गवई, पशुधन विकास अधिकारी, मेहकर.