परवानगी नसतानाही खामगावात भरला गुरांचा बाजार; लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
By अनिल गवई | Published: September 15, 2022 04:51 PM2022-09-15T16:51:04+5:302022-09-15T16:55:28+5:30
महाराष्ट्र राज्यात गुरांना मोठ्याप्रमाणात लम्पी या आजाराने ग्रासले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यातील जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे.
खामगाव - लम्पी आजारामुळे खामगावचा गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु, प्रशासकीय आदेशाची पायमल्ली करीत गुरुवारी खामगावातील बर्डे प्लॉट परिसरात गुरांचा बाजार भरविण्यात आला. गुरूवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर जनावरे खरेदी विक्रीकरिता आणण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यात गुरांना मोठ्याप्रमाणात लम्पी या आजाराने ग्रासले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यातील जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आणि संक्रमन टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून खामगावातील गुरांचा बाजार बंद ठेवण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र असे असतांनाही गुरुवारी येथील बर्डे प्लॉट परिसरातील महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये गुरांचा बाजार भरविण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनावरे खरेदी विक्री करिता आणण्यात आली होती. गुरांची खरेदी विक्री करणाºया काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे निर्देश धुडकावत गुरूवारी हा बाजार भरविल्याची चर्चा आहे. मात्र, यामुळे गुरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष
लम्पी हा संसर्गजन्य आजार असून एका गुरापासून दुसऱ्या गुराला या आजाराची लागण होते. त्यामुळेच राज्यभरातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र खामगावात गुरूवारी निर्देश धुडकवून परवानगी नसतानाही गुरांचा बाजार भरवण्यात आला. मात्र याकडे पोलीस प्रशासनासह संबंधित प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळातही भरविला होता बाजार
कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत देखील काही गुरांच्या व्यापाऱ्यांनी प्रशासकीय आदेशाची पायमल्ली करीत चिखली रोडवर गुरांचा बाजार भरविण्यात आला होता. वेळीच कोणतीही कारवाई न झाल्यामुळे गुरूवारी राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने खामगावात गुरांचा बाजार भरविण्यात आल्याची चर्चा आहे.