कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी, पाेलिसांनी पाठलाग करून पकडले
By संदीप वानखेडे | Updated: July 10, 2024 17:41 IST2024-07-10T17:40:07+5:302024-07-10T17:41:03+5:30
तीन गायींसह कार जप्त : उपविभागीय पाेलिसांच्या पथकाची कारवाई

कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी, पाेलिसांनी पाठलाग करून पकडले
बुलढाणा : महागड्या कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी करण्याचा प्रयत्न उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांच्या पथकामुळे फसला़ पाेलिसांना पाहताच चाेरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला़ पाेलिसांनी पाठलाग करून तीन गायींसह कार जप्त केली. बुलढाणा शहरातील त्रिशरण चाैकात पाेलिसांनी ही कारवाई १० जुलै राेजी केली.
बुलढाणा शहरातील कारंजा चाैकातून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार क्रमांक एमएच ०५ एएक्स १२१३ मध्ये गुरे काेंबून लंपास करण्यात येत हाेते. यावेळी गस्तीवर असलेल्या उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांच्या पथकाच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हे वाहन कारंजा चौक, एडेड चौक मार्गे चिखलीच्या दिशेने वेगाने धावत होते. पोलिसांचा पाठलाग सुरू हाेता. शेवटी कार त्रिशरण चाैकात साेडून तीन ते चार चाेरट्यांनी तेथून पळ काढला.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात तीन गायी निर्दयीपणे कोंबून नेल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या गायी चोरून नेल्या जात असतील असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील स्वत:या कारवाईत सहभागी होते. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकासह तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये एएसआय सुधाकर तारकसे, सतीश राठोड, संदीप मोधे, राजू जाधव सहभागी होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव खवले हे करीत आहेत.