काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:20 PM2020-07-10T17:20:27+5:302020-07-10T17:20:35+5:30
रेशन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्यानंतर विक्री झालेला साडेचार क्विंटल तांदूळ गुरूवारी सायंकाळी पुन्हा माथनी रोडवर पकडण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रेशन लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आल्यानंतर विक्री झालेला साडेचार क्विंटल तांदूळ गुरूवारी सायंकाळी पुन्हा माथनी रोडवर पकडण्यात आला. याप्रकरणी खामगाव येथील पुरवठा अधिकाºयांच्या तक्रारीवरून जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, खामगाव तालुक्यात चवथ्यांदा हा प्रकार घडल्याने, रेशनच्या तांदुळाची खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेटच सक्रीय असल्याचे समोर येत आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत रेशन लाभार्थ्यांना मोफत मिळालेल्या तांदूळाची भंगार व्यावसायिक आणि भुसार मालाचे व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यानंतर या तांदुळाची काळ्या बाजारात विक्री होत आहे. खामगाव तालुक्यात आतापर्यंत गोंधनापूर, सुटाळा, किन्ही महादेव आणि माथनी येथे या घटना उघडकीस आल्या. गुरूवारी सायंकाळी पकडण्यात आलेल्या तांदूळ प्रकरणी पुरवठा निरिक्षक विशाल भगत यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी शेख आबीद शेख हमीद रा.काशीपुरा मुक्ताईनगर जि. जळगाव याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑटोतून वाहतूक!
माथनी परिसरातील रेशन लाभार्थ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या १२ कट्टे तांदूळाची एमएच-१२ -डीटी-०२९५ या मालवाहू आॅटोतून वाहतूक केली जात होती. याबाबत माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील जुना टोल नाका येथे पकडण्यात आला. रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष रवि महाले यांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पुरवठा अधिकारी व्ही.एम. भगत यांनी पंचनामा करीत संबंधितांविरोधात तक्रार दिली.