चोरीच्या वीज तारेची विक्री पकडली, सहा जणांकडून मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Published: May 6, 2024 05:16 PM2024-05-06T17:16:36+5:302024-05-06T17:17:57+5:30
परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा.
अनिल गवई,खामगाव : चोरीच्या वीज तारेची विक्री करताना पकडून फोटो काढल्याने एकास सहा जणांनी धारदार शस्त्राने मारहाण केली. ही घटना रविवारी उशिरा रात्री स्थानिक टिळक मैदान परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, अब्दुल रहमान अब्दुल सत्तार (५४) यांना टिळक मैदानावरील एका दुकानात चोरीच्या वीज तारेची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाळत ठेवून छायाचित्र संकलित केले. त्यामुळे चिडून जात जफर खान सत्तार खान, अजिम खान फिरोज खान, मुजफ्फर खान सत्तार खान या तिघांनी मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटत पळ काढल्यानंतर जफर खान सत्तार खान, अजिम खान फिरोज खान, मुजफ्फर खान सत्तार खान, हसनैन खान जफर खान, जुनैन खान जफर खान, आफताफ खान फिरोज खान पाठलाग करीत असताना एका डेअरीजवळ थांबले.
आरोपीही तेथे आले. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ मोहम्मद सादिक अब्दुल गफ्फार, मुलगा मोहम्मद सालीम अब्दुल रहमान, जुलेखां बानो अब्दुल रहमान यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. यात मुलगा मोहम्मद सालीम अब्दुल रहमान यास मुजफ्फर खान सत्तार खान याने तर अजिम खान फिरोज खान याने मुलाच्या डाव्या पायावर पाइप मारून त्यास जखमी केले. त्याचवेळी भावाला जुनैन खान जफर खान याने छातीवर काठीने मारले. तसेच हसनैन खान जफर खान, आफताफ खान फिरोज खान यांनी फिर्यादीसोबतच त्यांच्या पत्नीला मारहाण करून दुकानातील गल्ल्याचे २२ हजार आठशे रुपये शर्टाचा खिसा फाडून काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, १४१, १४३, १४७, १४९ सहकलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
पैशांच्या व्याजासाठी मारहाण-
त्याचवेळी जफर खान सत्तार खान (५२) यांनी तक्रार दिली. त्यामध्ये त्यांच्या मुलाने अ. रहमान अ.सत्तार यांच्याकडून मोबाइल घेण्यासाठी व्याजाने पैसे घेतले. या पैशांच्या व्याजासाठी अब्दुल रहमान अब्दुल सत्तार, सादीक मेमन गफ्फार मेमन, सालीम मेमन रहमान मेमन, रिजवान पटेल, फैजान मेमन अब्दुल रहमान, दानीश मेमन सादीक मेमन यांनी संगनमत करून शिवीगाळ व मारहाण केली. तर, सादीक मेमन गफ्फार मेमन, सालीम मेमन रहमान मेमन, रिजवान पटेल या तिघांनी लोखंडी सळईने हल्ला चढविला. त्याचवेळी फैजान मेमन अब्दुल रहमान आणि दानीश मेमन सादीक मेमन या दोघांनी पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. त्यावरून पोलीसांनी सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, १४१, १४३, १४७, १४९, सहकलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार सोमवारी पहाटे गुन्हा दाखल केला.