सिंदखेडराजात आठ दिवसांत काेविड रुग्णालय सुरू हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:47+5:302021-05-18T04:35:47+5:30
सिंदखेडराजा : परिसरात काेराेना रुग्ण वाढत असल्याने काेविड रुग्णालय उभारण्याची मागणी हाेत आहे़ या मागणीची दखल घेत प्रशासनाने ...
सिंदखेडराजा : परिसरात काेराेना रुग्ण वाढत असल्याने काेविड रुग्णालय उभारण्याची मागणी हाेत आहे़ या मागणीची दखल घेत प्रशासनाने सिंदखेड राजा येथे काेविड रुग्णालय मंजूर केले असून, ते येत्या आठ ते दहा दिवसांत कार्यान्वित हाेईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी येथे दिली.
सिंदखेडराजा शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील रुग्णांना जालना, औरंगाबाद या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे़ मागील महिन्यात रुग्णांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत बेड मिळत नव्हते़ त्यामुळे सिंदखेडराजा येथे किमान ५० बेडचे कोविड रुग्णालय निर्माण करावे, अशी मागणी जोर धरू लागली. पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याने रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या़ जागापाहणी करण्यात आली. सध्या येथील सहकार विद्यालयात कोविड सेंटर आहे; त्यामुळे कोविड रुग्णालय तेथे करणे शक्य नव्हते़ मराठा सेवा संघाच्या जिजाऊ महिला रुग्णालयाची इमारत तयार होती़; परंतु शहरापासून दूर अंतर असल्याने प्रशासनाने ते नाकारले़ अखेरीस काळकोटमधील राज्य पुरातत्त्व विभागाच्या इमारतीत सादर रुग्णालय करण्याचे निश्चित झाले. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीनंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. रविवारी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, विभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, डॉ़ सुनीता बिराजदार यांनी या इमारतीची पाहणी केली असून, पुढील आठ दिवसांत रुग्णालय कार्यान्वित करण्याच्या सूचना गोगटे यांनी दिल्या आहेत.
शंभर बेडची सुविधा
या रुग्णालयात शंभर बेडची सुविधा असणार आहे. यातील ३० बेड हे ऑक्सिजनसाठी असणार आहेत; तर ७० बेड अंडर ऑब्झर्व्हेशन रुग्णांसाठी असणार आहेत़ ऑक्सिजन सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जम्बो सिलिंडरमधून एकाच कनेक्शनवर सर्व बेडचे ऑक्सिजन कनेक्शन करण्यात येणार आहे. पाण्याची, वीजपुरवठा नियमित राहावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला सूचित करण्यात आले असून, पालिका स्तरावरून सर्व नियोजन केले जाणार असले तरीही ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याचे सनियंत्रण करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोगटे यांनी दिल्या.