महाशिवरात्री साधेपणाने साजरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:09+5:302021-03-13T05:02:09+5:30
महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दुधा- ब्रह्मपुरी येथील श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानच्यावतीने आयोजित केले जाते. या ठिकाणी चालणाऱ्या नऊ दिवसांच्या महाशिवरात्री महोत्सवात ...
महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दुधा- ब्रह्मपुरी येथील श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानच्यावतीने आयोजित केले जाते. या ठिकाणी चालणाऱ्या नऊ दिवसांच्या महाशिवरात्री महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम जसे कीर्तन, हरिपाठ, भजन, रामायण कथा आयोजित करण्यात येते. या ठिकाणी भाविक भक्तांसाठी परिसरातील अन्नदाते यांच्यावतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या संस्थांवर लोकवर्गणीद्वारे महाप्रसादाचे वितरण होते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्यादिवशी पुरी व वांगी भाजीचा महाप्रसाद बनवण्यात येतो. या महाप्रसादाचे वितरण अनेक मान्यवरांच्या हस्ते भाविकांना बारी पद्धतीने करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीची पूजा मोजक्याच भाविकांच्या हस्ते करण्यात आली. दिवसभरात ओलांडेश्वर संस्थानवर दर्शनाकरिता तुरळक भाविकांनी हजेरी लावली. भाविकांनी कोरोनाबाबत सर्व नियम पाळून दर्शन घेतले.
कोट.....
मेहकर तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांवरील मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याबाबत कळविले आहे. ओलांडेश्वर संस्थानने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले आहे.
डाॅ. संजय गरकल, तहसीलदार, मेहकर.