संतनगरीत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:54 PM2020-02-15T18:54:53+5:302020-02-15T18:56:39+5:30
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक पार पडले.
शेगाव : श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव १५ फेब्रुवारीरोजी संतनगरीत उत्साहात साजरा झाला. हजारोच्यावर भजनी दिंड्या उत्सवाता सहभागी झाल्या होत्या. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या रजतमुखवट्यांसह नगर परिक्रमा निघाली होती.
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक पार पडले. शनिवारी सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र डांगरा, पंकज शितुत, किशोर टांक आदी मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी होती.
‘श्रीं’च्या मंदीरात शेगावी श्रींच्या प्रागट्या निमित्त हभप श्रीरामबुवा ठाकुर यांचे सकाळी १० ते १२ किर्तन झाले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. ‘श्री’च्या मंदीरात ठिक दुपारी १२ वाजता ‘श्रीं’ची आरती व पुष्पवृष्टी भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात येवून श्रींचा प्रकट उत्सव साजरा करण्यात आला. तद्नंतर ठिक दुपारी २ वाजता श्रींचे पालखीची नगर परिक्रमेस सुरूवात श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांच्या हस्ते रजत मुखवट्याचे पुजन व हरीनामाचा गजर करीत पालखी भाविक भक्तांच्या उपस्थितीत नगर परिक्रमेसाठी निघाली.
श्री गजानन अभियांत्रिकी महाविद्यालय श्री गजानन इंग्लिश स्कुल, नवोदय विद्यालय, विद्यार्थ्यांचा दिंडीचा सहभाग होता. श्रींची पालखी संध्याकाळी मंदीरात दाखल झाल्यानंतर याठिकाणी आरती झाली. रविवारी, ७ ते ८ सकाळी काल्याचे किर्तन होवून उत्सवाचा समारोप होणार आहे. श्री. गजानन महाराज संस्थानच्यावतीने भाविकासाठी सर्वप्रकारची व्यवस्था करण्यात आली होती.