शहरात सिमेंट रस्ते, ग्रामीण भागात डागडुजी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:48+5:302021-02-15T04:30:48+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात प्रत्येक शहराच्या ठिकाणी आता सिमेंटचे रस्ते करण्यावर भर देण्यात येत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील दुरवस्था ...

Cement roads in the city, not repaired in rural areas | शहरात सिमेंट रस्ते, ग्रामीण भागात डागडुजी होईना

शहरात सिमेंट रस्ते, ग्रामीण भागात डागडुजी होईना

Next

बुलडाणा : जिल्ह्यात प्रत्येक शहराच्या ठिकाणी आता सिमेंटचे रस्ते करण्यावर भर देण्यात येत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याकडेही लक्ष दिले जात नाही. निधी नसल्याने ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीची कामे रखडली असल्याचे सांगितले जाते. अनेक रस्त्यांच्या कामाची मुदत महिनाभरावर आलेली आहे.

रस्त्यावरुन त्या शहराचा किंवा त्या गावाचा विकास कसा आहे, हे समजते. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे निधी नसल्याचे कारण पुढे करून अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. बुलडाणा शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील इतर शहरांतही सिमेंटचे रस्ते करण्याची कामे जोरात सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहराला जोडून असलेल्या गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बुलडाणा शहर परिसरातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.

या भागात आहेत सर्वाधिक खड्डयांचे रस्ते

डोणगाव : जिल्ह्यात डोणगाव परिसरात सर्वाधिक खड्डेमय रस्ते आहेत. डोणगाव ते लोणी गवळी व शेलगाव देशमुख ते विश्वी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. डोणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, ग्रामीण भागातील लोकांची बाजारपेठ डोणगावला आहे. डोणगावपासून नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोणी गवळी रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरुन वाहने कशी चालवायची, असा प्रश्न पडत आहे.

खड्ड्याचा अंदाज हुकला

खड्ड्याचा अंदाज हुकल्याने अपघात झाला, असे प्रत्येक वाहनचालक अपघातानंतर म्हणतो. अनेक वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. अशीच परीस्थिती शेलगाव देशमुख ते विश्वी रस्त्याचीही झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने दुचाकी चालवताना कसरत करावी लागत आहे.

कोट..

ग्रामीण भागात रस्ते दुरूस्तीचा प्रश्न गंभीर बनत आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित लोणी गवळी व विश्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे.

निंबाजी पांडव, सभापती, पंचायत समिती, मेहकर.

Web Title: Cement roads in the city, not repaired in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.