केंद्राचे ‘क्युसीआय’ पथक बुलडाणा शहरात दाखल; शहरातील हगणदरीमुक्तीचा दर्जाची होतेय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:56 PM2018-01-04T15:56:51+5:302018-01-04T16:03:07+5:30
बुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे. केंद्र सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण प्राधिकरणाचे (क्युसीआय) हे पथक असून राज्य शासनाच्या हगणदरी मुक्त मोहिमेमध्ये बुलडाणा शहराचे मुल्यमापनामध्ये शहर पास झाल्याने आता केंद्राचे हे सर्वाेच्च पथक शहरात दाखल झाले आहे.
दरम्यान, पालिकेकडून या पथकाच्या हालचालीसंदर्भात गोपनियता पाळण्यात येत आहे. त्यामुळे हा विषय उत्सूकतेचा ठरतो आहे. गेल्या चार दिवसापूर्वी पालिकेने शहरातील स्वच्छतेचे कंत्राट आगामी काळासाठी निविदा दरसुचीत कमी दर असलेल्या कंत्राटदारांना डावलून जादा दर असलेल्या कंत्राटदाराला देण्याचा ठराव घेऊन प्रयत्न केला होता. त्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारित स्थगिती दिलेली असतानाच केंद्राचे हे पथक शहरात येऊन धडकल्याने हा मुद्दा नागरी सुविधा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर स्वरुपाचा असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय? या विषयासंदर्भात कमालीची गोपनियता पाळली जात आहे.
गुणवत्ता व दर्जाची तपासणी
बुलडाणा शहरातील शौचालयांची गुणवत्ता व दर्जा या पथकाकडून तपासल्या जात आहे. यामध्ये शहरातील एकंदर साफसफाई, शासकीय कार्यालयांची स्थिती, सार्वजनिक शौचालयांची तपासणीसह अन्य काही बाबींची या दोन सदस्यी पथकाकडून तपासणी होत आहे. बुलडाणा शहरात १५ हजारांच्या आसपास वैयक्तिक शौचालये दहा सार्वजनिक शौचालये असून त्यामध्ये १०४ शिट आहेत. बुलडाणा शहरातील दोन हजार २०० लोकांनी अनुदानातून शौचालये उभारली आहेत तर चार हजार २०० नागरिकांनी शौचलय उभारण्यासाठी अनुदान उचलले आहे. तीन सदस्यीय पथक बुलडाण्यात येणार होते मात्र प्रत्यक्षात दोनच समिती सदस्य आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.