केंद्राचे पथक गुरूवारी घेणार कापूस नुकसानाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:26 PM2018-05-15T17:26:52+5:302018-05-15T17:26:52+5:30
बुलडाणा : राज्य शासनाने खरीपातील पीक नुकसान भरापईसाठी केंद्र सरकारीच मदत मागितली असून त्यानुषंगाने केंद्राचे पथक गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यात पाहणी तथा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहे.
बुलडाणा : राज्य शासनाने खरीपातील पीक नुकसान भरापईसाठी केंद्र सरकारीच मदत मागितली असून त्यानुषंगाने केंद्राचे पथक गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यात पाहणी तथा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहे. दुसरीकडे याच दरम्यान, बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील ३५ कोटी ८२ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात ती थेट शेतकऱ्यां च्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारची दोन पथके राज्यात १५ ते १८ मे दरम्यान पाहणी करून तथा शेतकर्यांशी चर्चा करून बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेणार आहेत. जवळपास १६ जणांचा यामध्ये समावेश आहे. डीएसी अॅन्ड एफडब्ल्यूचे (सीड) अश्विनीकुमार, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या प्रमुख नंदीनी गोगटे नारखेडकर, केंद्रीय जल आयोगाचे आर. डी. देशपांडे, किटकशास्त्र विभागाचे फरिदाबाद येथील डॉ. के. डब्ल्यू देशकर, ग्रामविकास विभागचे चाहत सिंग,, मुंबई येथील एफसीआयचे डीजीएम एम. जी. टेंभुर्णे, केंद्र सरकारच्या पाणी व स्वच्छता मंत्रालयातील सहाय्यक सल्लागार ए. मुरलीधरन आणि डॉ. डी. के. श्रीवास्वत (दिल्ली) यांचा या पथकात समावेश आहे. दरम्यान, हे पथक सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे भेट देऊन शेतकर्यांशी प्रत्यक्ष कापूस नुकसानाबाबत चर्चा करणार आहे. तेथून पुन्हा हे पथक देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव येथे पोहोचणार असून तेथेही प्रत्यक्ष शेताची पाहणी करून शेतकऱ्यां शी संवाद साधरणार आहे. बोंडअळी मुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी खरीपात मोठा त्रस्त झाला होता. संपूर्ण हंगाम संपल्यानंतर केंद्राचे पथक आता जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे इतक्या विलंबाने हे पथक येण्याचा नेमका उद्देश काय? याबाबत संभ्रम आहे. परंतू राज्य शासनाने केंद्र सरकारकडे खरीपात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत मदत करण्याची मागणी केली आहे. त्यानुषंगाने हे पथक येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच प्रत्यक्षात राज्यात किती नुकसान झाले आहे, याचा अंदाजही ते शेतकऱ्यां शी थेट संवाद साधू घेणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले. बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टरवर शेतकऱ्यां नी कापसाचा पेरा केला होता. यापैकी बहुतांश कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाचे हक्काचे व नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटले होते. यासाठी जिल्ह्याने राज्य शासनाकडे नुकसान भरपाईची रक्कम मागितली होती.
बोंडअळी नुकसानाचा निधी प्राप्त
राज्य शासनाने खरीपात कापसावर पडलेल्या बोंड अळीमुळे झालेल्या नुकसान प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यासाठी १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. या निधी पैकी पहिल्या टप्प्यातील ४४.७८ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षीत होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३५.८२ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला सोमवारी प्राप्त झाला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील हा जवळपास ८० टक्के निधी असून येत्या दोन दिवसात तो शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तहसिल कार्यालयांना हा निधी पाठविण्यासंदर्भातील प्रक्रिया मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती.
केंद्राचे पथक ओलांडणार लक्ष्मण रेषा !
प्रदीर्घ कालावधीने केंद्राचे हे तांत्रिक व्यक्तींचा भरणा असलेले पथक जिल्ह्यात येत असले तरी ते फक्त मराठवाड्याची सीमा ओलांडून बुलडाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे. सावरगाव माळ (सिंदखेड राजा) आणि भिवगाव (देऊळगाव राजा) हे दोन्ही गावे जालना जिल्ह्याच्या सीमेवर अवघ्या एक किमी अंतरावर आहेत. विशेष म्हणजे सावरगाव माळ या गावातील अर्धे शिवार हे मराठवाड्यातच मोडते. त्यामुळे केवळ मराठवाड्याची सीमा ओलांडून अवघ्या एक किलोमीटरवरील गावांना हे पथक भेट देऊन जाणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपातील या भेटीमुळे बुलडाणा जिल्ह्याचे असे किती हित साधल्या जाईल, हाही संशोधनाचा विषय ठरावा. घाटाखालील मोताळा, मलकापूर, खामगाव या पट्ट्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. नेमका हा पट्टा या पथकाने सोडून दिला आहे. त्यामुळे एका अर्थाने केंद्राचे पथक फक्त मराठवाड्याची सीमा ओलांडण्यापुर्ते जिल्ह्यात दाखल होत असल्याची शंका आहे.