‘ओटीएस’द्वारे सेंट्रल बँकेने वसूल केले ६९ कोटींचे थकीत कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:29+5:302021-03-20T04:33:29+5:30
येत्या ३१ मार्चपर्यंत ही योजना सुरू राहणार असून त्याद्वारे सेंट्रल बँक १२९८१ थकबाकीदारांकडून आणखी ९९ कोटी ५१ लाख रुपये ...
येत्या ३१ मार्चपर्यंत ही योजना सुरू राहणार असून त्याद्वारे सेंट्रल बँक १२९८१ थकबाकीदारांकडून आणखी ९९ कोटी ५१ लाख रुपये वसूल करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील २२ ही शाखांमध्ये शिबिरांचे आयोजन करून एनपीएत गेलेेल कर्ज सूट देऊन काही प्रमाणात वसूल करण्याची मोहीम आखत आहे. दुसरीकडे १ एप्रिल २०२० पासून सुरू असलेल्या या योजनेंतर्गत बँकेने आतापर्यंत १६८ कोटी ५५ लाख रुपयांच्या थकीत कर्जापैकी ६९ कोटी ४ लाख रुपये वसूल केले आहेत. दहा मार्च रोजी बँकेने घेतलेल्या अशाच एका शिबिरामधून ७८ लाख रुपयांचे थकीत कर्ज वसूल केले होते. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात बँक आता ही मोहीम अधिक व्यापक करत असून थकबाकीदार कर्जदारांना त्याचा मोठा लाभ होण्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
--२२ मार्च रोजी घेणार कॅम्प--
सेंट्रल बँकेने याच मोहिमेच्या माध्यमातून २२ मार्च रोजी जिल्ह्यातील २२ ही शाखांवर ओटीएस (वनटाइम सेटलमेंट) उर्वरित बुडीत होऊ घातलेले कर्ज वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बँकेच्या १२९८१ थकबाकीदारांकडून आणखी ९९ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वसूल करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ आणि अकोला येथील क्षेत्रीय प्रबंधक विद्याधर पेडणेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.