सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:36 PM2019-09-17T12:36:04+5:302019-09-17T12:36:33+5:30
तब्बल ९०२ महिलांचे सिझेरियन झाले असून हे प्रमाण ३३ टक्क्यांवर पोहचले असल्याचे चित्र आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१८ ते आॅगस्ट २०१९ पर्यंत ५ हजार १६२ महिलांची प्रसुती झाली. यापैकी ४ हजार २६० नॉर्मल तर ९०२ महिलांचे सिझेरियन झाले. सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील गोरगरीब रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात. यामध्ये प्रसुतीसाठी येणाºया महिलांचे प्रमाणही अधिक आहे. यापूर्वी येथे स्त्री रोग तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने अनेक महिलांना सिझेरियनासाठी इतरत्र रेफर करावे लागत होते. आता ही पदे भरल्याने प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलांना सिझेरियनसाठी इतर रुग्णालयांमध्ये पाठविण्याची वेळ शक्यतोवर येत नाही. त्यामुळे महिलांना याठिकाणी चांगली सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी दिवसेंदिवस सिझेरियनचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एकुण ३ हजार ३५ तर आॅगस्ट २०१९ पर्यंत २ हजार १७४ महिलांची प्रसुती झाली. यापैकी तब्बल ९०२ महिलांचे सिझेरियन झाले असून हे प्रमाण ३३ टक्क्यांवर पोहचले असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, शेगाव, मेहकर, चिखली आणि मलकापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्येच सिझेरियनची व्यवस्था आहे. इतर शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना याठिकाणी प्रसुतीसाठी दाखल करावे लागते. परंतु येथे पोहचण्यासाठी विलंब होत असल्याने काही महिलांना मृत्यूही ओढवत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. असे प्रकार टाळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पातळीवर सकारात्मक उपायोजनांचा अवलंब होणे अपेक्षित आहे.
जागेची कमतरता व स्वच्छतेचा अभाव
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षात दिवसाला १० ते १२ महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. यापैकी नॉर्मल डिलीव्हरी झालेल्या महिलांना लवकर सुटी देण्यात येते. मात्र सिझेरियन झालेल्या महिलांना ४ ते ५ दिवस ठेवण्यात येते. येथील परिस्थितीवर एक नजर टाकल्यास या ठिकाणी असलेल्या खाटांची संख्या अपुरी पडत असल्याचे निदर्शनास येते. चांगली आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृृष्टीने याठिकाणी खाटांची संख्या वाढविण्याची गरज आहे. याबरोबरच येथे स्वच्छतेचाही मोठ्या प्रमाणात अभाव आहे. प्रसुती कक्षासमोर सर्वत्र कचरा पडला असून डुकरांचा सुळसुळाट झाला असल्याचे दिसून येत आहे.
सर्वसाधारणपणे एकुण प्रसुतीच्या १५ ते २० टक्के सिझेरियनचे प्रमाण असायला हवे. जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयांमधील स्थिती तपासल्यास हे प्रमाण व्यवस्थित असल्याचे दिसून येते. एखाद्या वेळेस हे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते. मात्र यामध्ये जास्त प्रमाणात तफावत आढळून येत नाही.
-डॉ. प्रेमचंद पंडीत,
जिल्हा शल्य चिकित्सक