राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:55 AM2017-08-15T00:55:42+5:302017-08-15T00:56:06+5:30
खामगाव : शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिलेले आश्वासन न पाळल्याने त्यांनी शेतकर्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकरी नेते खा.राजू शेट्टी यांनी केला. शेतकर्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतमालास भाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने दुसर्या टप्प्यातील आक्रमक आंदोलनास सोमवार १४ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत टेंभूर्णा फाट्यावर खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, सुकाणू समितीचे निमंत्रक कॉ.दादा रायपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, जितेंद्र चोपडे, राणा चंदन, रवी महाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना खा.शेट्टी म्हणाले की, आपण कृषिमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न विचारणार आहोत की, मोदी यांनी निवडणुकीत फक्त शेतकर्यांची मते मिळविण्यासाठी खोटी आश्वासने दिलीत की, शेतकर्यांचे प्रश्न त्यांना कळलेलेच नाहीत. या दोनपैकीच एक खरे असू शकते. मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातमध्ये शेतीची प्रगती झाली म्हणून ते देशातही शेती व शेतीला प्रगतीपथावर नेतील, असे वाटले होते; पण त्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही, असा गर्भित इशाराही शेट्टी यांनी दिला. आम्ही आमचा हक्क मागतोय. तुम्ही तीन वर्षांपासून आश्वासन पाळले नाही म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय. आमच्या न्याय्य हक्कांसाठी आता सर्वांशी दोन हात करण्याची आमची तयारी आहे. एनडीएच्या एवढय़ा जागा आल्यात त्या केवळ शेतकर्यांमुळेच. शेतकर्यांचे प्रेम तुम्ही पाहिलेत आता त्यांचा रागही पाहा, असे ते म्हणाले. यावेळी ना. रविकांत तुपकर म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची भीक मागत नसून तो त्यांचा हक्क आहे. या कर्जमाफीच्या मागणीला सैद्धांतिक अधिष्ठान आहे. शासनाकडून अपेक्षाभंग झाल्याने त्याच्याविरुद्ध लढा देण्याची वेळ आली. सरकारविरुद्धची खरी लढाई आता सुरु झाली आहे. शेतकर्यांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे आता सत्तेची गुर्मी व मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. परिणामी, वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
रस्त्यावरच खाल्ल्या आंदोलकांनी भाकरी
आंदोलनाच्या शेवटी आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी सोबत आणलेल्या ठेचा- भाकरी रस्त्यावर बसून खाल्ल्या. यावेळी खा.राजू शेट्टी, ना. रविकांत तुपकर आदींनीसुद्धा ठेचा -भाकर खावून शेतकर्यांना साथ दिली. यावेळी सुमारे एक हजारपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.