अवैध धंदे बंद करण्याचे नवीन ठाणेदारासमाेर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:08+5:302021-02-10T04:35:08+5:30
अंढेरा : अवैध धंदे सुरू असल्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अंढेरा पाेलीस स्टेशनचा प्रभार एपीआय राजवंत आवठले यांनी स्वीकारला आहे. पाेलीस ...
अंढेरा : अवैध धंदे सुरू असल्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अंढेरा पाेलीस स्टेशनचा प्रभार एपीआय राजवंत आवठले यांनी स्वीकारला आहे. पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान त्यांच्यासमाेर राहणार आहे.
अंढेरा पाेलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येतात. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच ठाणेदारांवर तसेच काही बिट जमादारांना पैसे घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तसेच त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे. अंढेरा, मेरा बु., देऊळगाव घुबे, शेळगाव आटोळ, डिग्रस अशा बिट येत असून सदर बिट अंतर्गत अवैध वरली मटका, जुगार, अवैध देशी दारू, अवैध गुटखा विक्री, ब्लास्टिंग ट्रॅक्टर, अवैध रेती वाहतूक जोमात सुरू असून सगळीकडे अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. यापूर्वीचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांनी सगळीकडे थैमान घातले हाेते. बुलडाणा येथील एलसीबीच्या पथकाने अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अनेकदा छापा मारत अवैध देशी दारू, वरली मटका, जुगारावर कारवाई केली हाेती. तसेच पोलीस स्टेशनसमोरून अवैधरीत्या रेतीची टिप्पर वाहतूक होत हाेती. महसूल अंतर्गत येत असल्याचे कारण पुढे करीत त्यांना साेडून देण्यात येत हाेतेे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी या सर्व प्रकाराची दखल घेत अंढेरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची एका आदेशाने तत्काळ नियंत्रण विभाग बुलडाणा येथे बदली केली असून त्यांच्या जागी चिखली येथील एपीआय राजवंत आठवले यांची ठाणेदार पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्यासमाेर अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान आहे.