एटीएम फोडणाऱ्या टोळीचा छडा लावण्याचे पाेलिसांसमाेर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 11:32 AM2021-08-01T11:32:37+5:302021-08-01T11:32:44+5:30
Crime News : आता या तीन एटीएम फोडीमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एकाच रात्री जिल्ह्यातील तीन एटीएम फोडून ५६ लाखांची रोकड पळविणाऱ्या टोळीचा माग काढण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, या घटनेत दिल्ली, हरियाणाचे कनेक्शन तर नाही ना? याचीही शक्यता तपासण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनीही यासंदर्भाने संबंधित ठाणेदारांकडून आनुषंगिक माहिती घेत तपासाची दिशा निश्चित करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.
विशेष म्हणजे चिखली-खामगाव या मार्गावरील तीन गावांतील स्टेट बँकेचे मात्र आऊट सोर्सिंगद्वारे दिले गेलेले एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातून तब्बल ५६ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चिखलीनजीकचे शेलूद येथून २७ लाख २२१ रुपये, उंद्री येथील एटीएममधून ९ लाख ९६ हजार आणि पळशी येथील एटीएममधून १९ लाख रुपये ३० जुलै रोजीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रासह, पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मेहकर, लोणार तालुक्यातीलही एटीएम गेल्या वर्षी फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो फसला होता. मात्र आता या तीन एटीएम फोडीमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सायबर सेलचीही मदत यात घेतल्या जाणार आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या तिन्ही ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या पोलीस करत आहेत. यातून एटीएम फोडणाऱ्या टोळीचे काही धागेदोरे मिळतात का? याची पाहणी सध्या पोलीस करत आहेत. तपासाच्या दृष्टीने काही बाबी अद्यापही पोलिसांनी गोपनीय ठेवलेल्या आहेत.
टोळीवर नजर
दिल्ली, हरियाणा राज्यातील सीमावर्ती भागात एटीएम फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती पाहता या टोळीचे तर हे काम नाही ना? या दिशेनेही पोलिस तपास करत आहे. गुजरात-राजस्थान मधील एका टोळीने जिल्ह्यातून ट्रॅक्टर चोरीचा सपाटा लावला होता. त्याच धर्तीवर ही एटीएम फोडणारी टोळी तर जिल्ह्यात सक्रिय झाली का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
स्टेट बँकेचे ४० पेक्षा अधिक एटीएम
स्टेट बँकेअंतर्गत आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून जवळपास ४० पेक्षा अधिक एटीएम जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एका व्यवस्थापकाचीही नियुक्ती केली गेली आहे. विशेष म्हणजे या एटीएमवर असलेले सुरक्षारक्षकही मधल्या काळात काढून घेण्यात आलेले आहेत. त्याचाच फायदा या टोळीने घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.