पीक कर्ज वाटपाचे बँकांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:58 AM2021-06-21T10:58:23+5:302021-06-21T10:59:16+5:30
Crop Loan News : येत्या काळात बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील ४१ हजार ६२२ शेतकऱ्यांना ३६९ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून एकूण उदिष्ठाच्या ते ते अवघे २८ टक्के आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांनापीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सुचनेनुसार गेल्या तीन वर्षाच्या उदिष्ठ पुर्तीच्या सरासरीच्या आधारावर जिल्ह्यास पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ दिलेले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ मिळालेले आहे. त्यामुळे हे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ बँकांना पुर्ण करावेच लागणार असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठही मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तब्बल ३ लाख ६२ हजार २२८ शेतकऱ्यांना २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांचे उदिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी ४२ टक्के शेतकऱ्यांना ५१ टक्के पीक कर्जाची रक्कम वाटप करण्यात आली होती.
यंदा पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठच कमी झाल्यामुळे बँकांकडून उदिष्ठाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनीही गेल्या आठवड्यात बँकांकडून नेमके किती उदिष्ठ पुर्ण झाले याचा आढावा घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाण्यात आले असता या मुद्द्यावर त्यांनी आ. हर्षवर्धन सपकाळांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. दुसरीकडे दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ जुलै पर्यंत बँकांनी शेतकऱ्यांना खरीपासाठीचा पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली.
२० दिवसात १३६ कोटी वाटप
बँकांनी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासंदर्भात हालचाली कराव्यात, अशा सुचनाही अग्रणी बँकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने गेल्या २० दिवसात १५ हजार १३६ शेतकऱ्यांना १३६ कोटी २४ लाख रुपयांचे बँकांनी कर्ज वाटप केले आहे.
जिल्ह्यात ४१ हजार ६२२ शेतकऱ्यांना ३६९ काेटी ५२ लाख रूपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दीष्टाच्या ३० टक्के शेतकऱ्यांच्या हातात पिक कर्जाची रक्कम पडली आहे. सर्व शेतकऱ्यांना पिककर्ज मिळले, या दृष्टीने आमचे नियाेजन असून पिककर्ज वाटपाचा वेगही वाढत आहे.
- नरेश हेडाऊ,
व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक