अनेक ठिकाणी परिवर्तन; राष्ट्रवादीची सरशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:59+5:302021-01-19T04:35:59+5:30
मुकुंद पाठक सिंदखेड राजा: तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून, तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा व दुसरबीड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी ...
मुकुंद पाठक
सिंदखेड राजा: तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून, तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा व दुसरबीड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहेत.
तालुक्यात एकूण ४० ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. बहुतांशी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पक्षाने विजय मिळविल्याचे चित्र आहे. सर्वाधिक चर्चा असलेल्या साखरखेर्डा येथील ग्रामपंचायतीत शिवसेनेची २० वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. येथे राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसने मिळून लढविलेल्या गाव विकास पॅनलला १७ पैकी १६ जागांवर विजय मिळाला आहे. तर दुसरी मोठी ग्रामपंचायत दुसरबीडमध्येही राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. येथे सेना-भाजपला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. चिंचोली जहाँगीर येथे माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला ७ पैकी ७ जागांवर विजय मिळाला आहे. गारखेड, वसंतनगर या छोट्या परंतु महत्त्वाच्या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
आपापल्या गावचे निकाल हाती येताच बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल,हिरवा गुलाल आणि हळदीची उधळण करीत कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.