हमाल कंत्राटदारांच्या निवड प्रक्रियेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:26 PM2019-12-04T12:26:10+5:302019-12-04T12:26:17+5:30
जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आतापर्यंत शासकीय धान्य गोदामातील हाताळणूक एकाच हमाल कंत्राटदारावर सोपविण्यात येत होती. परंतू आता हमाल कंत्राटदार निवडण्याचे स्वरूप बदलले आहे. जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे. त्यामुळे धान्य गोदामातील हमाल कंत्राटदारांच्या स्पर्धेला लगाम लागणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत होणाऱ्या अन्नधान्य वितरणासाठी जिल्ह्यात १६ शासकीय धान्य गोदामे आहेत. पहिले एकच संस्था सर्व गोदामाचा हमालीचा कारभार पाहत असे. परंतू आता तसे होणार नाही. मध्यंतरी जिल्ह्यातील हमालांकडून मजूरीच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता. तसेच धान्य हाताळणूक हमाल कंत्राट व वाहतूक असे दोन्ही कंत्राट एकत्र देण्यात येत होते; तो शासन निर्णय सुद्धा रद्द झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील शासकीय धान्य गोदामातील अन्नधान्याच्या हाताळणूकीसाठी हमाल कंत्राट चालू वाहतूक कंत्राट संपेपर्यंत किंवा तीन वर्ष यापैकी जे अगोदर घडेल, त्या कालावधीसाठी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
धान्य हमाल कंत्राट निवडण्याची प्रक्रिया ही आॅनलाइन राबविण्यात येत आहे. त्यासाठी २५ नोव्हेंबरपासून कंत्राटदारांना निविदा मागविण्यात आली आहे. यावेळी एकाच संस्थेकडे सर्व गोदामांचा कारभार राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, अमडापूर, देऊळगाव राजा, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मेहकर, डोणगाव, लोणार, सिंदखेड राजा या सर्वच शासकीय धान्य गोदामाकरीता स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. यामध्ये प्रत्येक संस्थेने ठरवून दिलेल्या दरचा विचार करून सर्वात कमी दर असणाºया संस्थेचा कंत्राट निश्चित करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. मुदतीत प्राप्त होणाºया प्रस्तावावर जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समितीकडून निवडीची प्रक्रिया होईल.
१६ गोदामावर हमाल कंत्राट निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १६ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. आता प्रथमच प्रत्येक गोदामनिहाय संस्थेकडून स्वतंत्र प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत.
- गणेश बेल्लाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.