दुकानाच्या वेळेत बदल, व्यापाऱ्यांची वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:27+5:302021-06-28T04:23:27+5:30
कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत ...
कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला असला, तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत ८५ हजार ७६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
बसमध्ये उभे राहून प्रवासास बंदी
मोताळा: नवीन निर्बंधानुसार सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.
लसीकरणाला प्राधान्य द्या
सिंदखेड राजा: तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गावागावात शिबिरही घेण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाली. त्यामुळे लसीकरणाला प्राधान्य द्या, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
काढा खरेदीवर भर
लोणार: कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील जलजन्य आजार हाेऊ नये, म्हणून नागरिकांनी काढा खरेदीवर भर दिला आहे. जलजन्य आजार होऊ नयेत, यासाठी प्या उकळून व गाळून पिण्याचा सल्लाही आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.
ग्रामीण भागात घरोघरी आरोग्य तपासणी
मेहकर: तालुक्यातील अनेक गावात मागील आठवड्यात घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य विभाग सतर्क झाला असून, गावात घरोघरी फिरून आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे.
पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा
किनगाव राजा: परिसरातील अनेक पाणंद रस्त्यांना आमदार निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे; परंतु मंजुरी मिळूनही अद्याप या रस्त्याच्या कामांना सुरुवात झालेली नाही. पावसाळा सुरू झाला तरी शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा आहे.
जि.प. शाळांमधील वर्गखोल्यांची दुरवस्था
अमडापूर : चिखली तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती. परिसरातील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळाला नाही. त्यामुळे वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बालकांच्या वैयक्तिक स्वच्छतेविषयी जागृती
बुलडाणा: बालकांच्या आरोग्याठी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी व मास्क वापरण्याविषयी पालकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऑनलाइन वीज बिल भरण्याला प्रतिसाद
बुलडाणा: वीज ग्राहकांनी महावितरणचे वीज बिल ऑनलाईन भरण्याला पसंती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक ग्राहक महावितरणच्या या ऑनलाईन सुविधेकडे वळले आहेत.