सातासमुद्रापल्याड ‘गण गण गणात बोते’चा जयघोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:19 AM2020-05-03T10:19:14+5:302020-05-03T10:20:34+5:30
इंग्लड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा या देशातही महाराजांच्या भक्तवर्गांकडून साजरा करण्यात आला.
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा : गुरूपुष्यामृत योगावर झुणका भाकर महानैवेद्य अर्पण सोहळा व गजानन विजय ग्रंथाचे पारायण लॉकडाउनमुळे घरोघरी करण्यात आले. हा सोहळा महाराष्ट्रातच नव्हे तर इंग्लड, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा या देशातही महाराजांच्या भक्तवर्गांकडून साजरा करण्यात आला. सातासमुद्रापल्याड ‘गण गण गणात बोते’चा जयघोष झाला. सोहळ्यात सहभागी भक्तांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सव्वा दोन लाख भाविकांनी सहभाग घेतल्याची नोंद आहे.
विदर्भाची पंढरी शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचा भक्तवर्ग देश विदेशात आहे. गजानन महाराजांचा कुठलाही उत्सव हा महाराष्ट्रपुरता मर्यादीत राहत नाही; तो विदेशातही थाटामाटात साजरा होतो. अध्यात्म क्षेत्रात गुरूपुष्यामृत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरूवार, ३० एप्रिल रोजी गुरूपुष्यामृत योग होता. त्यानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांनी ‘झुणका भाकर महानैवेद्य’ अर्पण सोहळा साजरा करण्याचा संकल्प केला होता. या लॉकडाउनमध्ये श्रींचा हा सोहळा प्रत्येकाने घरात साजरा करून त्याची समितीकडे नोंद करण्याचे नियोजन गेल्या काही दिवसांपासून केले होते. श्री गजानन महाराज यांना गुरूपुष्य योगावर ‘श्री गजानन विजय गं्रथ’ अध्याय १६ वामध्ये महाराजांचे परम भक्त भाऊ कवर यांनी जसा नैवेद्य अर्पण केला त्याचप्रमाणे भक्तांनी ‘झुणका भाकर’ महानैवेद्य अर्पण करून श्रींचे पारायण केले. याच मुहूर्ताचे औचित्य साधुन लॉकडाऊनच्या कारणास्तव सर्व भक्तांनी आपापल्या घरीच एक दिवसाचे पारायण व ३ भाकरी, झुणका (पिठल्ल), कांदा, ठेचा असा नेवेद्य महाराजांना अर्पण केला. महाराष्ट्रसह विदेशातही हा उत्सव साजरा करण्यात आला.
याठिकाणी झाला उत्सव
झुणका भाकर महानैवेद्य व पारायणाचा हा उपक्रम महाराष्ट्र, भंडारा, गोंदिया, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, रत्नागिरी, सावंतवाडी या सर्व भागात झाला. गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्लीसह विदेशातील अमेरीका (कॅलिफोर्निया), कॅनडा, अल्ट्राँटिका प्रदेश, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर, या देशातून श्री संत गजानन महराजांना महानैवेद्य अर्पण सोहळ्यात भाविकांनी सहभाग घेतला.
नोंद घेण्याची प्रक्रिया सुरूच
या उपक्रमात सहभागी झाल्याची नोंद समितीकडे घेण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे अजुनही उत्सव साजरा केलेल्या भक्तांची संख्या वाढणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली.