गावागावात रथ, रॅली; पोटजातीच्या तोडणार भिंती!
By admin | Published: September 13, 2016 02:49 AM2016-09-13T02:49:52+5:302016-09-13T02:49:52+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील बैठकांना समाजातील सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. १२: मराठा क्रांती मोर्चाची तयारी करण्याकरिता गावा-गावात रथ व रॅली काढण्यात येणार आहे. यासोबतच या मोर्चाद्वारे पोटजाती संपवून सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येने सहभागी करण्याचा निर्धार चिखली येथील बैठकीत सोमवारी करण्यात आला.
२६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारी जोमात सुरू असून, ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी बुलडाणा येथे पार पडलेल्या सभेनंतर सोमवारी चिखली येथे सभा पार पडली. या सभेत मोर्चाच्या आयोजनाकरिता विशेष रथ तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. या रथाद्वारे २६ सप्टेंबर रोजी पार पडणार्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे; तसेच गावा-गावांमध्ये दुचाकी रॅलीही काढण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये पोटजाती दूर सारून सकल मराठा समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात राजपूत, कुणबी, मराठा, देशमुख, धनवटे, वाईनदेशी, दखणे, दक्षिण मराठा आदी पोटजाती आहेत. काही राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी या पोटजातीमध्ये नागरिकांना विभागून जातीयतेचे राजकारण केले. त्यामुळे या पोटजातींमध्ये काही ठिकाणी द्वेश निर्माण झाला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने हा द्वेश संपवून एकत्र येण्याचे आवाहन या बैठकांमध्ये करण्यात आले आहे. मूळ व कूळ न बघता या पोटजातींच्या भिंती तोडून सकल मराठा समाजाने एकत्र होऊन लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अन्य जातीमधील नागरिकांचाही सहभाग
४मराठा समाजाच्या या मोर्चाला अन्य समाजातील नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लीम समाजातील नागरिकांनीही मोर्चेकर्यांना पाणी वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच चिखली शहरात भगवे झेंडे लावण्याचे आवाहन काही समाजातील नागरिकांनी केले.
मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही
४बुलडाणा, लोणार व चिखली येथे पार पडलेल्या सभांमध्ये मराठा समाजाचा मोर्चा हा कोणत्याही समाजाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीचा विरोध नसल्याचे उपस्थितांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. समाज आपल्या मागण्या घेऊन एकत्र येत असून, कोपर्डी घटनेचा निषेध करीत आहे; मात्र या मोर्चाच्या माध्यमातून कुणालाही लक्ष्य करणे किंवा कुणाच्या विरोधात बोलणे, हे उदिष्ट नसल्याचे बैठकांमधून स्पष्ट करण्यात येत आहे.