खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याने तीन एकर भुईमुगामध्ये चारली मेंढरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:36 PM2021-05-31T12:36:00+5:302021-05-31T14:56:15+5:30
Agriculture News भुईमूग काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने तीन एकर शेतात मेंढ्या सोडल्या.
- शांताराम तायडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ढोरपगाव : दिवठाणा परिसरात भुईमुगाच्या शेंगामध्ये अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भुईमूग काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने तीन एकर शेतात मेंढ्या सोडल्या.
निमकवळा येथील शेतकरी प्रवीण इंगळे यांच्या दिवठाणा येथील शेतात ऐन काढणीस आलेल्या भुईमुगामध्ये मेंढरं चारली. किडीमुळे भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भुईमुगाच्या शेगांना अळीने पोखरले आहे. त्यामुळे कुणीही विकत घ्यायला तयार नसल्याने या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वर्षभर केलेल्या मशागतीनंतर पीक काढणीस आले होते. याकरिता शेतकऱ्याला हजारो रुपयांचा खर्च आला. मात्र, काढणीच्या वेळीस परिसरात किडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. खराब झालेल्या भुईमुगाला खामगावमध्ये कोणताही व्यापारी घेण्यास तयार नाही, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतही विकल्या जात नाहीत. शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरच मदत मिळावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे.
यावर्षी मी भुईमुगाची पेरणी केली. मात्र, भुईमुगाच्या शेंगामध्ये अळीने पोखरणे चालू केले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी व माझा घर खर्च कसा चालवावा, अशी चिंता सतावत आहे.
- प्रवीण इंगळे, शेतकरी, निमकवळा खामगाव.