स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी!

By Admin | Published: May 15, 2017 12:16 AM2017-05-15T00:16:27+5:302017-05-15T00:16:27+5:30

दुकाने नियमित सुरु राहत नसल्याने कार्डधारकांना त्रास

Cheap grain shoppers arbitrarily! | स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी!

स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनाळा : येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून मनमानी कारभार सुरू असल्याने कार्डधारक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून, हा आदिवासीबहुल परिसर आहे. या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांची संख्या सात असून, यामधील काही दुकानांना आजूबाजूची गावेसुद्धा जोडलेली आहेत; परंतु पुरवठा विभागाचे स्वस्त धान्य दुकानदारांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक दुकानांसमोर दर्शनी फलक लावलेले नाहीत, दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ नमूद नसल्याने कार्डधारकांची गैरसोय होत आहे, तसेच स्वस्त धान्य उपलब्ध झाल्यानंतर संबंधित दुकानदाराने त्याबाबत गावात मुनादी देऊन नागरिकांना सूचित करणे आवश्यक असताना तसे केले जात नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील माल केव्हा आला व कोठे गेला, ते समजत नाही. काही दुकानांसमोर कार्डधारक सकाळपासून रांगा लावून बसतात. ११ वाजेपर्यंत ते उन्हात ताटकळत असतात; पण दुकानदार न आल्याने बऱ्याचदा त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. काही दुकानदार केवळ रविवारी बाजाराच्या दिवशी दुकान सुरू ठेवत आहेत. इतर दिवशी दुकान बंद राहत, त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागते.

खुल्या बाजारात मालाची विक्री
काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात स्वस्त धान्याची विक्री केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. ७०० रुपयांना गव्हाचे एक कट्टे दुकानदारांनी खुलेआम विक्रीला काढले असल्याचे ग्राहक बोलताना दिसून येतात. सदर गहू व्यापारी खरेदी करीत असून, नव्या गव्हात मिसळून १८०० ते २००० रुपयांच्या भावाने विकत असल्याचा आरोप केल्या जात आहे.
गेल्या ३० वर्षांपासून सोनाळा येथे सहकारी सोसायटीची दोन दुकाने सुरू आहेत. ही दुकाने रेशनचा माल आल्यानंतर १० दिवस सुरू राहत असून, सकाळ, संध्याकाळ वाटप करण्यात येते. त्यामुळे अन्य दुकानदारांनी सोसायटीपासून आदर्श घ्यावा, अशी अपेक्षाही कार्डधारक व्यक्त करताना दिसून येतात.

स्वस्त धान्य दुकानदारांनी नियमांचे पालन करून कार्डधारकांना स्वस्त धान्याचे वितरण करावे. याबाबत तक्रारी येऊ देऊ नयेत. स्वस्त धान्य वाटपात अनियमितता आढळून आल्यास दोषींवर कारवाई केली जाईल.
- एल. के. चव्हाण,तहसीलदार संग्रामपूर.

Web Title: Cheap grain shoppers arbitrarily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.