बाेगस तणनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांची फसवणूक
By विवेक चांदुरकर | Published: February 8, 2024 06:18 PM2024-02-08T18:18:29+5:302024-02-08T18:20:52+5:30
शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड.
विवेक चांदूरकर, खामगाव जि.बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्क, बोरखेड : कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्यांना बोसग तणनाशकाची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार बोरखेड परिसरात उघडकीस आला आहे. गव्हाच्या पिकात शेतकऱ्यांनी फवारणी केल्यानंतरही तण कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कृषी विभागाने तणनाशक कंपनी व विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील, बोरखेड, सोनाळा, वारखेड, सगोडा, दानापूर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी काढून डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केली. पिके चांगली येतील, या आशेने शेतकऱ्यांनी वेळेवर खत दिले. गव्हाच्या पिकात तण उगवल्यामुळे तणनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र, तणनाशक फवारल्यावरही तण कायम आहे. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे तणाचा नायनाट होत नसल्याने मजूर लावून निंदण करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तणनाशक औषधांची गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तीन एकर गव्हाच्या पिकामध्ये दोन वेगवेगळ्या कंपनीचे तणनाशक फवारले. फक्त वीस टक्के तण जळाले. उर्वरित तण कायम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादक कंपनी तसेच विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकावर कारवाई करण्याची गरज आहे. - अरुण आगरकर, शेतकरी, सोनाळा