छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजनेस प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:10 PM2019-08-17T15:10:19+5:302019-08-17T15:11:04+5:30
खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीने ‘छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास सुरूवात केली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: समाजातील विधवा आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, या एकमेव उद्देशातून खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीने ‘छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास सुरूवात केली आहे. स्वातंत्र्यदिनापासून रामनगर ग्रामपंचायतीच्या या योजनेचा लाभ दिल्या ग्रामपंचायतच्यावतीने दिल्या जात आहे.
रामनगर येथील गरजू विधवा निराधार असलेल्या महिला तसेच त्यांच्या मुलांना शालेय शिक्षणात मदत व्हावी, या प्रमुख उद्देशातून छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी ११०० रुपयांची तरतूद ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली. तसा ठराव ग्रामपंचायतीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवित स्वातंत्र्यदिनापासून गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जात आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शत्रूघून बावणे, शाळा समिती अध्यक्ष महेंद्रशिंह राठोड, ग्रामपंचायत सदस्य गौतम शेगोकार, मुख्याध्यापक रमेश जुमळे यांचे हस्ते शाळेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत १.२५ लक्ष रुपये किंमतीचे शौचालय भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच उपसरपंच सर्वस्वी ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तथा गावकरी मंडळी त्याचप्रमाणे कर्मचारी उपस्थतीत होते.
स्वातंत्र्यदिनी शिष्यवृत्तीचे वितरण
स्वातंत्र्य दिनी सागर श्रीराम खंडागळे या विद्यार्थ्याचा सांभाळ करणाºया त्याच्या आजीस ही शिष्यवृत्ती सरपंच दुर्गाताई रवी महाले तर रोशन रमेश मुंडाले या विद्यार्थ्याच्या आईस सचिव ढोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील महादेव मेसरे या विद्यार्थ्यांच्या आईस पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शेळके यांनी शिष्यवृत्तीची रक्कम प्रदान केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य शिवहरी सोळंके यांनी केले. तर ध्वजपूजन माजी पोलीस पाटील रघुनाथ महाले यांनी तर ध्वजारोहण सरपंच दुगार्ताई रवी महाले यांनी केले.
समजातील विधवा, निराधार आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनापासून या योजने सुरूवात केली आहे.
-दुर्गाताई महाले
सरपंच, रामनगर ता. खामगाव.