नियुक्तीसाठी लाच घेताना मुख्य लिपिकास पकडले
By सदानंद सिरसाट | Published: June 12, 2023 08:12 PM2023-06-12T20:12:49+5:302023-06-12T20:13:17+5:30
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव.
मलकापूर :मलकापूर शिक्षण समितीच्या मुख्य लिपिकास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली, त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकाने येथील बसस्थानक परिसरातील मंदिरासमोर ही कारवाई केली.
मलकापूर शिक्षण समितीच्या चार संस्थांचा कारभार गोविंद विष्णू महाजन विद्यालयातील मुख्य कार्यालयातून चालतो. त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणून नंदनवन नगरातील विलास उत्तम सोनुने (५२) कार्यरत आहेत. संस्थेचे कामकाज तेच पाहतात, असे सूत्रांनी सांगितले. मलकापूर शिक्षण समितीच्या हिराबाई संचेती कन्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याचा सन २०१२ साली मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांचा मुलगा संस्थेत बिनपगारी काम करीत आहे. त्याला सेवेत कायम करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
ती रक्कम द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा कार्यालयात तक्रार दाखल केली. पथकाने मलकापुरात सापळा रचला. सोमवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरातील मंदिरासमोरच्या दुकानात तक्रारदाराने मुख्य लिपिक विलास उत्तम सोनोने यांना एक लाख रुपये दिले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, विलास साखरे, विनोद लोखंडे, मो. रिजवान, प्रवीण बैरागी, स्वाती वाणी, गौरव खत्री यांनी केली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावे लाचेची मागणी
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीला मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे मलकापूर शिक्षण समिती या संस्थेमार्फत सादर करण्यात आला. या प्रस्तावास शिक्षणाधिकारी कार्यालयातून मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपी सोनुने याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावे २ लाख रुपयांची लाच मागणी करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे या लाचेच्या रकमेत कोण वाटेकरी आहेत, याचा तपास आता लाचलुचपत विभागाकडून केला जाणार आहे.