दुष्काळमुक्तीचा बुलडाणा पॅटर्न राज्यभरात नेऊ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:30 PM2018-03-03T15:30:32+5:302018-03-03T15:30:32+5:30
बुलडाणा : दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीने बुलडाण्यात राबविण्यात येणार गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम बुलडाणा प्रकल्पाचा पॅटर्न राज्यभरात नेऊ असे प्रतिपदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बुलडाणा येथे केले.
बुलडाणा : दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीने बुलडाण्यात राबविण्यात येणार गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम बुलडाणा प्रकल्पाचा पॅटर्न राज्यभरात नेऊ असे प्रतिपदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बुलडाणा येथे केले. दरम्यान, शासन, खासगी संस्था आणि लोकसहभाग अशी एक नवी चळवळ जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून राज्यात निर्माण झाली आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले. बुलडाणा येथे भारतीय जैन संघटनेच्यावतीने राबविण्यात येणार्या सुजलाम सुफलाम बुलडाणा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, खा. प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आ. डॉ.संजय कुटे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहूल बोंद्रे, शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमुलकर, माजी मंत्री सुरेशदादा जैन, भातीय जैन संघटनेचे शांतीलाला मुथा, जलसंधारणचे सचिव एकनाथ डवले, समृद्धी योजनेचे (चेन्नई) अरुणकुमार जैन, जेसीबी कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक बिपीन सौंधी, कृष्णकुमार गोयल, माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, आयजी सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज तीन वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. मात्र ते राबविण्यापूर्वी जोपर्यंत यात लोकसहभाग राहणार नाही, तोपर्यंत प्रत्यक्षा जमीनीवर त्याचे फायदे मिळणार नाही. त्यामुळे लोकांचा सहभाग या मध्ये महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव झाल्याने लोकसहभाग, शासन आणि खासगी संस्थांचा सहभाग यात वाढवून या कामाला प्राधान्य दिल्या गेले. त्यामुळेच आज पीपीपी ही संकल्पना (शासन (पब्लिक), प्रायव्हेट (खासगी संस्था) आणि पीपल (लोक)) ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रात काम करण्यास प्रारंभ केला होता. त्याचे दृष्यपरिणाम आता समोर येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळून जलसंधारणच्या कामाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वाटर कप स्पर्धेमुळे त्याला हे अधिष्ठाण प्राप्त झाले असून बुलडाण्यातील दुष्काळ मुक्तीचे हे अभियान एक अभूतपूर्व प्रयोग असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. या कामांमुळे आज राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहे. २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. प्रारंभी दुष्काळ होता. एक वर्ष बरे गेले. यंदा उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र वेळेवर निसर्गाने दगा दिला. परिणामी राज्यातील १५ हजार गावातील शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे दुष्काळ ही एक समस्या निर्माण झाली आहे. परंतू जलसंधारणाच्या कामामुळे या दुष्काळावर आपण मात करू शकतो. जलसंधारणाची चळवळ सुरू झाल्याने लोकसहभाग वाढला त्यातून पाणी उपलब्ध होत आहे. पाण्यामुळे शेती समृद्ध होते आणि त्यातून सामाजिक आर्थिक संपन्नता निर्माण होते. हे सुत्र लक्षात आल्याने या कामांवर भर दिल्या जात असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी १३४ जेसीबींचे प्रतिकात्मक पूजन आणि दीपप्रज्वलन करून सुजलाम सुफलांम बुलडाणा अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पॅटर्न राबवणार
बुलडाणा जिल्ह्यात सुरू झालेले सुजलाम सुफलाम बुलडाणा हे अभियान एक पॅटर्न म्हणून सुजलाम सुफलाम महाराष्ट्र अशा स्वरुपात संपूर्ण राज्यात राबविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात प्रथमत: ते राबविले जाईल, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. पाणी आणि रस्ते हे घटक विकासाचा मार्ग निर्वेध करणारे आहे. त्या दृष्टीने रस्ते विकासावरही काम सुरू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ७० वर्षात ५००० किमीचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण झाले. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या दूर दृष्टीकोणातून गेल्या तीन वर्षात या कामामध्ये १५ हजार किमी रस्त्यांची भर घातली आणखी काही कामे वेगाने होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.