मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि अकोलेकरांची निराशा!
By admin | Published: February 12, 2016 02:14 AM2016-02-12T02:14:47+5:302016-02-12T02:14:47+5:30
दुष्काळ, आयुक्तालयाची घोषणाच नाहीच; अनेक मुद्यांना स्पर्शही केला नाही.
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौरा निराशाजनक ठरल्याची चर्चा राजकीय वतरुळात होती. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासोबतच पोलीस आयुक्तालयाच्या घोषणेचे अपेक्षा या दौर्यात होती. मात्र, यापैकी कोणतीही घोषणा झाली आणि अनेक विषयांना तर त्यांनी स्पर्शही केला नाही. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता सोपविताना निर्णय प्रक्रियेत गती येईल ही अपेक्षा होती; मात्र काँग्रेस आघाडीच्या काळात ज्या प्रमाणे कासव गतीने निर्णय प्रक्रिया सुरू होती, तशीच प्रक्रिया आताही सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळेच गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात अकोलेकरांना अपेक्षा असलेल्या अनेक विषयांना स्पर्शच झाला नसल्याने अकोलेकरांची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या अकोला दौर्यात लोकप्रतिनिधींकडून विविध योजनांच्या घोषणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. यात प्रामुख्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणे आणि संवेदनशील अकोला शहरासाठी पोलीस आयुक्तालयाची घोषणा, या दोन प्रमुख मुद्यांचा समावेश होता. याशिवाय पर्यटन विकास, औद्योगिक विकासाला चालना मिळणार्या योजना, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना, पारस येथील विस्तारित वीज निर्मिती प्रकल्पाची घोषणा, सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी रखडलेले सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. अकोलेकरांसोबतच येथील लोकप्रतिनिधींनी तशी अपेक्षा व्यक्त केली होती. यातील बहुतांश विषयांना मुख्यमंत्र्यांनी स्पर्शच केला नाही. ज्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेत, त्यातूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या आशा आणि आकांक्षा मुख्यमंत्र्यांच्या दौर्यातून पूर्ण होऊ शकल्या नाहीत.