चिखली-बुलडाणा आगाराच्या अनेक बस फेऱ्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:36+5:302021-09-11T04:35:36+5:30
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट काळामध्ये अनेक लांब पल्ल्याच्या बसेस एसटी महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोनाचे ...
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट काळामध्ये अनेक लांब पल्ल्याच्या बसेस एसटी महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे हळूहळू बसेस सुरू झाल्या असल्या तरी चिखली, मेरा खु., अंत्रीखेडेकर, मेरा बु., शिंदी, साखरखेर्डा या मार्गावर अद्याप बस सुरू झाली नाही. प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे अंत्रीखेडेकर, मेरा बु., शिंदी-साखरखेर्डा येथील प्रवाशांचे हाल होत आहे. चिखली आगाराची सकाळी ७ वाजता जाणारे चिखली-काठोडा साखरखेर्डा ही बस अनेक दिवसांपासून बंद आहे. तसेच बुलडाणा आगराची बुलडाणा -आडगाव राजा-तसेच दुपारी २ वाजता येणारी चिखली-साखरखेर्डा, चिखली तसेच जाफराबाद आगाराची जाफराबाद ते साखरखेेर्डा, बुलडाणा आगाराची - लोणार ते बुलडाणा, बुलडाणा - सिंदखेडराजा तसेच मलकापूर आगराची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मलकापूर-वझर सरकटे या बसेस सध्या बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत.
खासगी वाहनचालकांनी केली भाडेवाढ
चिखली, बुलडाणा जाण्याकरिता सकाळनंतर कुठल्याही प्रकारची बस राहत नाही. तसेच सिंदखेडराजा येथे जाण्याकरिता लोक मलकापूर-वझर सरकटे या गाडीने दुसरबीडपर्यंत जात होते. हीसुद्धा लांब पल्ल्याची गाडी बंद आहे. यामुळे खासगी वाहनधारकांनी भाडेवाढ केली आहे. शिंदी येथील प्रवाशांना कुठे जायचे असल्यास अगोदर साखरखेर्डा येथे जावे लागत आहे. बंद झालेल्या बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिंदी येथील सरपंच विनोद खरात यांनी केली आहे.