चहुबाजूने चिखली शहर ‘लॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:02+5:302021-05-12T04:36:02+5:30
जिल्हा प्रशासनाने २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केल्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच चिखली पोलिस अॅक्शन मोडवर दिसून आले. पालिका प्रशासनदेखील शहरात ...
जिल्हा प्रशासनाने २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केल्यानंतर सोमवारी रात्रीपासूनच चिखली पोलिस अॅक्शन मोडवर दिसून आले. पालिका प्रशासनदेखील शहरात कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी दक्ष असल्याचे दिसून आले. मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या नेतृत्वात पालिकेचे पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले असून प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त आहे. वैद्यकीय कारणांशिवाय शहरात प्रवेश करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. विनाकारण शहरात दाखल होणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून ठोस कारणाशिवाय कोणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्यावर कारवाईसह दंडुका दाखविल्या जात आहे. वाहतूकदेखील बंद असल्याने सर्व रस्ते ओस पडले आहेत. शहरात केवळ दवाखाने व मेडिकल दुकाने सुरू असून केवळ याच ठिकाणी अगदी तुरळक प्रमाणात नागरिक दिसत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडूनदेखील या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
सर्व मार्ग सील
शहरातील सर्व प्रमुख रस्ते प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स लावून चेकपाॅइंट तयार करण्यात आले असून, या ठिकाणी पालिका, पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाचे कर्मचारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.