चिखली शहर कडकडीत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:44 AM2017-08-15T00:44:03+5:302017-08-15T00:44:27+5:30

चिखली : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील  यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रॉन्झ’ धातुने बनविलेल्या स्थानिक डी.पी.रोड स्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्‍वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ चिखली शहरात १४ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. 

Chikhali city shut up! | चिखली शहर कडकडीत बंद!

चिखली शहर कडकडीत बंद!

Next
ठळक मुद्देजनतेच्या सहभागाने निघाली भव्य रॅली सर्व राजकीय पक्ष, संघटनांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील  यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रॉन्झ’ धातुने बनविलेल्या स्थानिक डी.पी.रोड स्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्‍वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ चिखली शहरात १४ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. 
शहरातील सर्व राजकीय पक्ष, संघटनांसह महाराणाप्रेमी जनतेने यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर शहरातील सर्व भागांतील व्यापारी व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. या बंदमुळे येथील आठवडी बाजार तसेच बैलबाजार देखील बंद होता. दरम्यान, आजचा बंद शांततेत पार पडला. यानुषंगाने शहरातून काढण्यात आलेली भव्य निषेध रॅलीदेखील शांततेत पार पडली. येथील डी.पी.रोड स्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाची एका मद्यपीकडून विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले; मात्र या घटनेनंतरही सर्व महाराणा प्रेमींनी आपला संयम ढळू न देता पोलिसांना आरोपीच्या शोधासाठी सहकार्य केले; मात्र अशा घटना पुढे घडू नये व समाजमन दूषित करण्याच्या प्रकाराला आळा बसावा तसेच सर्व महाराणाप्रेमी जनतेच्या मनातील असंतोष आणि तीव्र भावनेला वाट मोकळी व्हावी, म्हणून घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी चिखली शहर बंदची हाक  शहरातील सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी दिली होती. त्यानुसार १४ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजेपासूनच महाराणा प्रताप पुतळा परिसरात मोठय़ा प्रमाणावर महाराणाप्रेमी जनता उपस्थित होती. प्रारंभी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खा.प्रतापराव जाधव, आ.राहुल बोंद्रे, आ.अमितसिंग राजपूत, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, शिवराणा मित्रमंडळाचे संस्थापक प्रा.नरेंद्र खेडेकर, महाराणा प्रताप पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंग राजपूत, राजपूत महासंघाचे अध्यक्ष सुभाष राजपूत, मुक्त्यारसिंग राजपूत, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, जि.प.सभापती श्‍वेता महाले, जि.प.सदस्य शरद हाडे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता, अंबिका अर्बनचे अध्यक्ष अँड.विजय कोठारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय चेके पाटील, आर्यनंदी अर्बनचे अध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे,  बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, रासपचे दत्ता खरात, शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, विवेकानंद अर्बनचे अध्यक्ष कुणाल बोंद्रे, एकता अर्बनचे अध्यक्ष शे.अनिस, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड आदींची उपस्थिती होती.
महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ास अभिवादन केल्यानंतर येथून बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, चिंच परिसर, राजा टॉवर, बाबू लॉज चौक, आठवडी बाजार आदी मार्गांवरून काळय़ा फिती लावून निषेध रॅलीद्वारे बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. तर प्रारंभी मूक रॅली असल्याने कोणीही घोषणा देऊ नये, असे जाहीर करण्यात आले होते; मात्र तरीही काही अतिउत्साही तरूणांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर मोर्चादरम्यान मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके आदी महामानवांच्या पुतळय़ास हार अर्पण करून अभिवादन केले. मोर्चा पुन्हा महाराणा प्रताप पुतळा येथे पोहोचल्यानंतर या ठिकाणी मुंबई येथील राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष जगदिशसिंग भानुछा, अजयसिंह ठाकूर, संजयसिंह कछवा यांच्या मार्गदर्शनानंतर मोर्चाची सांगता झाली. मोर्चासाठी तालुका व परिसरातील गावातून मोठय़ा संख्येने समाजबांधव शहरात दाखल झाले होते. ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात सहकारी पोलीस कर्मचार्‍यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर शहरात संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला व या बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. 

Web Title: Chikhali city shut up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.