स्वाध्याय उपक्रमात चिखली जिल्ह्यात अव्वलस्थानी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:35+5:302021-04-12T04:32:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) 'स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) 'स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम अेसेसमेंट' (स्वाध्याय) योजनेची सुरुवात ३ नोव्हेंबरला करण्यात आली होती. हा उपक्रम सुरू झाल्यापासून चिखली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत साप्ताहिक सराव आणि गृहशिक्षणास सुरुवात केली असल्याने या उपक्रमात चिखली तालुका बुलडाणा जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे.
कोरोनामुळे अचानक करण्यात आलेले लॉकडाऊन आणि त्यामुळे बंद झालेल्या शाळा यामुळे विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक संकट निर्माण झाले होते, पण शासनाच्या 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' या उपक्रमातंर्गत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने 'स्वाध्याय' हा उपक्रम सुरू केला होता. यामध्ये व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून पहिली ते १० वीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांना फोनवर प्रश्नमंजूषा स्वरूपात घरच्या घरी अभ्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्याचे एक साधन म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. प्रामुख्याने दीक्षा अॅप, विविध प्रकारच्या लिंक, व्हाट्सॲप, शाळाबाहेरची शाळा यासारख्या उपक्रमाअंतर्गत सद्यस्थितीत दररोज दहा प्रश्न आकलनात्मक असतात. दर आठवड्याला वेगवेगळे विषय व नवीन प्रश्नांचा समावेश यात केला जातो. दर शनिवारी लिंकद्वारे सुरुवात होवून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत लिंक सुरू असते. याकाळात विद्यार्थ्यांनी लिंकवर दिलेले प्रश्न सोडवायचे असतात. याअंतर्गत गत आठवड्यात एकविसावा स्वाध्याय पूर्ण झाला असून त्यामध्ये राज्यात बुलडाणा जिल्हा तृतीय क्रमांकावर तर चिखली तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद व डायटचे प्राचार्य शिंदे प्रयत्नशील आहेत.
९५.८३ टक्के विद्यार्थ्यांचा नियमित सराव !
चिखली तालुक्यात एकूण ४६ हजार ५९ विद्यार्थीसंख्या असून यापैकी ४४ हजार १३९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रम सोडविला आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेनुसार नियमितपणे स्वाध्याय उपक्रम सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.८३ इतकी आहे. दरम्यान, चिखली तालुका १९ व २० क्रमांकाच्या स्वाध्याय उपक्रमांमध्येसुद्धा प्रथम क्रमांकावर होता.
कोरोनासारख्या कठीण काळात शाळा बंद असून सद्य:स्थितीत स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी यांना शिक्षणासोबत जोडून ठेवण्यासाठी व गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे.
-आर. डी. शिंदे गटशिक्षणाधिकारी, चिखली
..............................