चिखली : अनैतिक संबंधात अडसर ठरणार्या पतीचा खून; अचानक मृत्यू झाल्याचा रचला बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:15 AM2018-01-19T01:15:27+5:302018-01-19T01:15:50+5:30
चिखली: नात्याने आतेभाऊ असलेल्या प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला कळाल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या घडवून आणली व त्याचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला; मात्र चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला व अवघ्या ७२ तासात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. हे हत्याकांडात स्थानिक संभाजीनगरमध्ये १६ जानेवारीला घडले. यामध्ये संजय शंकर देव्हरे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: नात्याने आतेभाऊ असलेल्या प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला कळाल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या घडवून आणली व त्याचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला; मात्र चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला व अवघ्या ७२ तासात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. हे हत्याकांडात स्थानिक संभाजीनगरमध्ये १६ जानेवारीला घडले. यामध्ये संजय शंकर देव्हरे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्थानिक संभाजीनगर भागात संजय शंकर देव्हरे (२९) हा आपली पत्नी संगीता संजय देव्हरे (२५) आणि मुलगी वैष्णवी (३) यांच्यासह मागील ३ महिन्यांपासून किरण तुकाराम मोरे यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होता. यातील आरोपी पत्नी संगीता देव्हरे हिचे गत दिवाळीपासून तिचा आतेभाऊ सुनील जानकीराम हुंड्यार (२७, रा. गल्ली नं ४, पुंडलिक नगर, औरंगाबाद) याच्यासोबत सूत जुळल्याने त्याचे वारंवार चिखलीला येणे सुरू झाले. त्याचे असे वारंवार येणे संजयला खटकू लागल्याने पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले व पती संजय देव्हरे याचा पत्नी संगीतावर संशय बळावत गेला.
संगीताचे सुनीलसोबतचे अनैतिक संबंध असल्याची इत्थंभूत माहिती आपल्या पतीला झाली असल्याची खात्री झालेल्या संबंधामध्ये अडसर ठरणार्या पतीलाच कायमचे संपवण्याचा विचार संगीता व सुनील यांच्या मनात १५ दिवसांपूर्वीच पक्का झाला होता. त्यानुसार १६ जानेवारी रोजी सुनील हा चिखली येथे आला व त्याने व संजय याने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मनसोक्त मद्यपान केले व रात्नी मटन पार्टीदेखील केली. या पार्टीदरम्यान आरोपी सुनीलने संजयला दारूमध्ये झोपेच्या गोळय़ा दिल्या व तो झोपल्यानंतर त्याचे हात पाय साडीने बांधले व दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. सकाळी ५ वाजेच्या सुमारास पुन्हा औरंगाबाद येथे निघून गेला. १७ जानेवारी रोजी पहाटे संगीता हिने आपले सासरे शंकर मनिराम देव्हरे (केवट) (रा. जुनेगाव कुंभारवाडा चिखली) यांना फोन करून संजयची तब्येत अचानक खराब झाली असून, लवकरात लवकर खोलीवर येण्यास सांगितले. त्यांना संजय मृतावस्थेत दिसून आला. पोलिसात माहिती दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
दरम्यान, घटनास्थळी ठाणेदार महेंद्र देशमुख व पीएसआय सुधाकर गवारगुरू यांनी पाहणी केली असता ठाणेदार देशमुख यांच्या नजरेत मृतक संजयच्या गळय़ावर असलेले व्रण दिसून आल्याने त्यांना घातपाताचा संशय आला. तसेच शवविच्छेदन अहवालातही गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यांनी संगीताला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रारंभी तिने नकार दिला; मात्र कसून चौकशी केल्यानंतर तिने प्रियकर सुनील हुंड्यारच्या साथीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. यावरून ठाणेदार देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, एसडीपीओ श्याम महामुनी यांना घटनेची माहिती देऊन या घटनेतील फरार आरोपी सुनील यास ताब्यात घेण्यासाठी पीएसआय मोहन पाटील, हेकाँ तायडे, सोनकांबळे, गजानन वाघ यांना औरंगाबाद येथे पाठवून सुनीलला अटक केली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुधाकर गवारगुरू व उमेश शेगोकार करीत आहेत.