डफडे मोर्चाने दणाणली चिखली नगर पालिका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:44+5:302021-08-12T04:39:44+5:30
चिखली : येथील डी. पी. रोडवरील दुकानांसमोर असलेले अस्थाई अतिक्रमण हटवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करत वेळोवेळी निवेदने देऊनही पालिका ...
चिखली : येथील डी. पी. रोडवरील दुकानांसमोर असलेले अस्थाई अतिक्रमण हटवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करत वेळोवेळी निवेदने देऊनही पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करत न. प. प्रशासनाला जागे करण्यासाठी डी. पी. रोड व्यापारी संघटनेच्यावतीने १० ऑगस्टला ‘डफडे बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे न. प. परिसर दणाणून गेला होता.
चिखली शहरातील प्रमुख मार्ग असलेला व पोलीस स्टेशन, नगरपालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय अशा महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांना जोडणारा डी.पी.रोड हा एक महत्त्वाचा रस्ता आहे़ या रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे रहदारीस त्रास होतो़ शिवाय व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने मागील दोन वर्षांपासून हे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापारी संघटनेद्वारा वारंवार निवेदने देण्यात येत आहेत. मात्र या निवेदनांचा न. प. प्रशासनावर काहीच परिणाम न झाल्याने अखेरीस व्यापाऱ्यांनी न. प. प्रशासनाच्या विरोधात १० ऑगस्टला डफडे बजाओ आंदोलन पुकारले. स्थानिक डी. पी. रोडवरून सुरुवात झालेला हा मोर्चा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, राजा टॉवरमार्गे नगरपालिकेवर धडकला. यावेळी जोरदारपणे डफडे वाजविल्याने पालिका आवार दणाणून निघाला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपले निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. डी. पी. रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा यांनी पालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचा कर देऊन पालिका प्रशासन आमच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाईलाजाने कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ‘डफडे बजाओ’ आंदोलन करण्यात आले, यानंतरही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला तर माजी नगरसेवक नीलेश अंजनकर यांनीदेखील पालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला. या मोर्चामध्ये डी. पी. रोड व पारधी बाबा रोडवरील सर्व व्यावसायिक आपापली दुकाने बंद ठेवून सहभागी झाले होत.
कारवाईस सभागृहाचा विरोध !
व्यापाऱ्यांच्या अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचा ठराव सर्वसाधारण बैठकीमध्ये घेण्यात आल्यानंतर एकाही नगरसेवकाने त्याची बाजू घेतलेली नाही. पर्यायाने सभागृहाच्या निर्णयाविरोधात जाऊन पालिका प्रशासनास कारवाई शक्य नसल्याचा निर्वाळा आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.