चिखली न.प.विषय समिती निवडणूक बिनविरोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:39+5:302021-02-26T04:48:39+5:30
चिखली नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या नेमणुकीसाठी यापूर्वी २१ जानेवारी रोजी पालिकेच्या सभेमध्ये पाच विषय समितीच्या सभापतिपदांपैकी चारच ...
चिखली नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या नेमणुकीसाठी यापूर्वी २१ जानेवारी रोजी पालिकेच्या सभेमध्ये पाच विषय समितीच्या सभापतिपदांपैकी चारच समितीच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यातही एकपेक्षा अधिक अर्जावर सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या असल्याने या विशेष बैठकीत केवळ दोनच विषय समितीच्या सभापतिपदाची निवड झाली होती. तथापि भाजपा नगरसेवकाने काँग्रेस नगरसेवकांच्या पाठिंब्याने सभापतिपद मिळविले होते. यावरून ही बैठक चांगलीच गाजली होती. उर्वरित तीन समित्या व सभापतिपदासाठी २५ फेब्रुवारीला पालिका सभागृहात सकाळी ११ वाजता 'ऑनलाईन' विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. ऑनलाईन उपस्थित सदस्यांची हजेरी पुस्तकात नोंदी घेण्यात आल्या. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम समितीच्या प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. यामध्ये बांधकाम सभापतिपदासाठी ममता शैलेश बाहेती यांचा एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाला होता. यावर सूचक म्हणून सुदर्शन खरात, अनुमोदक पंडितराव देशमुख होते. शिक्षण समिती सभापती पदासाठी विमल रामदास देव्हडे यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यास सूचक गोविंद देव्हडे, अनुमोदक नामदेव गुरूदासानी होते. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी प्रभावती मुकुंदराव एकडे यांचा अर्ज होता. सूचक प्रा.मीनल गावंडे व अनुमोदक अर्चना खबुतरे असलेला एकच अर्ज दाखल झाल्याने तीनही सभापतींची निवड अविरोध झाली. पालिकेतील काँग्रेसचे गटनेते मो.आसिफ यांनी महिला व बालकल्याण समिती रद्द करण्याबाबत अर्ज सादर केला होता; परंतू हा अर्ज विशेष सभेच्या कामकाजाशी संबंधित नसल्याने तसेच पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकाराच्या कक्षेत येत नसल्याचे स्पष्ट करीत हा अर्ज खरीज केला. सभेच्या कामाकाजाच्या नोंदी घेण्यासह व्हिडीओ चित्रीकरणाव्दारे देखील नोंदी घेण्यात आल्या. मुख्याधिकारी अभिजित वायकोस, प्रशासन अधिकारी अर्जूनराव इंगळे व पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सभेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.