चिखली अर्बनचा कर्जदारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:34+5:302021-01-03T04:34:34+5:30
चिखली अर्बन को-ऑप. बँकेने छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना कर्जपुरवठा करण्याचे काम सातत्याने केले आहे. यामुळेच अनेक ग्राहक बँकेचे नियमित ...
चिखली अर्बन को-ऑप. बँकेने छोट्या व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना कर्जपुरवठा करण्याचे काम सातत्याने केले आहे. यामुळेच अनेक ग्राहक बँकेचे नियमित खातेदार आणि कर्जदारदेखील आहेत. ज्यांचे कर्ज आर्थिक अडचणीमुळे थकीत होणार आहे अशा खातेदारांना आता पुनर्गठण करून देताना जे व्याज भरू शकतील अशा खातेदारांंचे तसेच जे भरूच शकत नाहीत, अशांचेदेखील पुनर्गठण केले जाणार आहे. या निर्णयामुळे कुणीही कर्जदार थकीत राहणार नसल्याने त्यांची बँकेत पत कायम राहणार असल्याचे मत चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी व्यक्त केले.
बँकेने कर्जदारांबरोबर ठेवीदारांच्यादेखील पाच लाखांच्या ठेवी सुरक्षित केल्या आहेत. दोन लाखांचे विमाकवच ठेवीदारांना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोविडमुळे बाहेरून घरी आलेले युवक बेरोजगार झाले असून, त्यांच्यासाठीसुद्धा व्यवसायाकरिता माफक दरात कर्ज सुविधा देणार आहे. आता बँकाच गरजू कर्जदारांचा शोध घेऊन त्यांना कर्ज देणार आहे. बेरोजगारांना कुक्कुटपालन शेळी पालनासाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. कोविडमुळे त्रस्त कर्जदारांनी घाबरून न जाता पुनर्गठण करून आपले खाते सुस्थितीत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सतीश गुप्त यांनी केले आहे. (वा. प्र.)
हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आकर्षक योजना !
दि चिखली अर्बन बँकेच्या हिरक महोत्सवी वर्ष तसेच नवीन वर्षाच्या पृष्ठभूमीवर बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनीही ग्राहक, खातेदार, बचत गटांच्या महिलांसाठी फायदेशीर ठरणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गत पगारदारांसाठी केवळ ७.२५ टक्के व्याजदरात गृहतारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.